बाबासाहेबांच्या स्वप्नातील समता समरसतेच्या मार्गाने शक्य; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

20 Mar 2026 16:29:48
Devendra Fadnavis
 
महाड : (Devendra Fadnavis) महाडच्या ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभी समतेच्या लढ्याच्या स्मृतींना उजाळा देणारा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. याच कार्यक्रमात दैनिक मुंबई तरुण भारत वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या “समतेचे क्रांतीपर्व : चवदार तळे सत्याग्रह” या विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील समताधिष्ठित समाज साकार करायचा असेल, तर त्यासाठी समरसतेचा मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
 
चवदार तळे शताब्दी मंचावर आयोजित या कार्यक्रमात बोलताना फडणवीस पुढे म्हणाले की, रायगडची ही भूमी इतिहास घडवणारी आहे. याच भूमीतून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच ठिकाणी समतेच्या स्वराज्याची दिशा दाखवली. महाडचा सत्याग्रह हा केवळ एका घटनेपुरता मर्यादित नसून, तो जागतिक स्तरावर मानवाधिकारांच्या लढ्याचे प्रतीक आहे. “त्या काळातील अस्पृश्यता, जातीभेद आणि अन्यायकारक प्रथा यामुळे देश आणि समाज विखुरलेला होता. बाबासाहेबांनी या व्यवस्थेविरोधात उभा केलेला लढा हा केवळ पाण्यासाठी नव्हता, तर माणसाच्या स्वाभिमानासाठी होता. याच सत्याग्रहातून समाजाला समतेचा आणि मानवतेचा मूलभूत संदेश मिळाला,” असे ते म्हणाले. हा इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
 
हेही वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोननंतर छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांची धुरंधर राजकीय खेळी
 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य शासनाच्या वतीने चवदार तळ्याच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतल्याची माहिती दिली. तसेच इंदू मिल येथील भव्य स्मारक लवकरच पूर्णत्वास येणार असून, बोधगया येथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी महाडच्या सत्याग्रहाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत, “समानता, स्वाभिमान आणि न्यायाच्या वाटचालीत बाबासाहेबांच्या विचारांप्रमाणे कार्य करणे, हीच खरी त्यांना अभिवादन ठरेल,” असे सांगितले. महाडचे आमदार व मंत्री भरत गोगावले यांनी “चवदार तळे सत्याग्रह हा आपल्या इतिहासाचा प्रेरणादायी वारसा असून, तो पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे,” असे नमूद केले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या काव्यशैलीतून बाबासाहेबांच्या संघर्षाला अभिवादन केले.
 
या कार्यक्रमाला मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, खासदार धैर्यशील पाटील, खासदार ज्योती वाघमारे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, माजी मंत्री विजयभाई गिरकर, आमदार प्रवीण दरेकर, बार्टीच्या प्रभारी संचालक दीपाली मुंडे-मोहोळ, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, भाजपा अनुसूचित मोर्चा प्रदेशाध्यक्ष विश्वजित गायकवाड, विवेक विचार मंच राज्य संयोजक सागर शिंदे व निखिल आठवले यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी दैनिक मुंबई तरुण भारतचे सामाजिक न्याय प्रतिनिधी सागर देवरे आणि सिनियर स्पेस सेल्स एक्झिक्युटिव्ह प्रशांत कांबळे उपस्थित होते.
 
 
Powered By Sangraha 9.0