मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोननंतर छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांची धुरंधर राजकीय खेळी
सातारा जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच भाजपाचा झेंडा!
20-Mar-2026
Total Views |
सातारा : (BJP Makes History in Satara) महाराष्ट्रात पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद निवडणुकांनंतर सातारा जिल्हा परिषदेमध्ये राजकीय समीकरणांना कलाटणी देणारी मोठी घडामोड घडली आहे. राज्याच्या स्थापनेनंतर प्रथमच सातारा जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापनेत यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, राज्यभरात दिसून आलेला भाजपाचा करिश्मा आता सातारा जिल्ह्यातही स्पष्टपणे पाहायला मिळाला आहे.
या निवडणुकीत भाजपाचे संख्याबळ केवळ २८ सदस्यांपर्यंत मर्यादित असताना, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी आपल्या अचूक राजकीय रणनीतीने अतिरिक्त पाठिंबा मिळवत एकूण ३३ सदस्यांचा पाठिंबा भाजपच्या बाजूने उभा केला. याउलट शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी गटाला केवळ ३० मते मिळाली, ज्यामुळे जिल्ह्यातील सत्ता समीकरण पूर्णपणे बदलले आहे.
या निर्णायक बहुमताच्या आधारे भाजपच्या प्रिया शिंदे यांची सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी राजू भोसले यांना संधी मिळाली आहे. या विजयामुळे केवळ सत्ता परिवर्तन झाले नाही, तर साताऱ्यासारख्या पारंपरिक राजकीय बालेकिल्ल्यात भाजपने आपली मजबूत पकड निर्माण केल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कॅबिनेट मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली घडलेली ही राजकीय खेळी सातारा जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण ठरली आहे. स्थानिक पातळीवरील सूक्ष्म नियोजन, प्रभावी संवाद आणि संघटन कौशल्य यामुळे भाजपाला हा ऐतिहासिक विजय मिळवता आला. सातारा जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच भाजपाचा झेंडा फडकला असून, यामुळे आगामी काळात जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसेच, या निकालामुळे राज्यातील राजकीय समीकरणांवरही दूरगामी परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांची धुरंधर राजकीय खेळी मानली जात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोननंतर भाजपने बाजी उलटवली असल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा एका मताने थरारक विजय हा साताऱ्यात भाजपचा करिश्मा पुन्हा एकदा अधोरेखित करणारा विजय ठरला आहे.