भोंदुगिरी करून स्वत:ला अंकशास्त्रज्ञ म्हणवून घेणाऱ्या कॅप्टन अशोक खरात याला महिलांवरील लैंगिक अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि फसवणूक या गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आली. हा भोंदूबाबा सध्या पोलिस कोठडीत आहे. पोलिसांना त्याच्याकडून तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्यानं या प्रकरणाचं गांभीर्य अधिक वाढलं. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, हा ५८ व्हिडीओंचा आकडा शंभरीपार गेल्याचे समजते. हळूहळू या प्रकरणाचे धागेदोरे आणि अशोक खरात याचे राजकीय नेत्यांशी असलेले लागेबांधे समोर येत आहेत. त्याचे अनेक राजकीय नेत्यांसोबतचे फोटोही सध्या व्हायरल होता आहेत.
त्यामुळे या प्रकरणाला मिळालेलं राजकीय वळण अधिकच गडद होताना दिसतंय.अशोक खरातच्या भोंदूगिरीला राजकीय आश्रय मिळत होता का? भोंदुगिरीच्या नावावर त्याने किती संपत्ती जमवली? आणि खरातचा हे काळे कृत्य कसे समोर आले आणि या प्रकरणात आतापर्यंतचे अपडेट्स काय आहेत? जाणून घ्या सविस्तर अपडेट्स
खरातचे ते ५८ व्हिडिओ उघडकीस कसे आले?
एका ३५ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर नाशिक येथील तथाकथित अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात याला महिलांवर अत्याचाराच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीये. आता अशोक खरातचा हा कारनामा कसा बाहेर आला त्याबद्दल थोडक्यात समजून घेऊया. माध्यमांमधील काही वृत्तांनुसार, स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातने नाशिकच्या कॅनडा कॉर्नर येथील 'ओजस प्रॉपर्टीज' या कार्यालयात अनेक महिलांवर केलेल्या अत्याचाराचे व्हिडिओ सीसीटीव्हीच्या रूपाने जतन केले होते. खरातचा विश्वासू ऑफिस बॉय नीरज जाधव याने डिसेंबर २०२५ मध्ये खरातच्या नकळत ५८ महिलांवरील अत्याचाराचे फुटेज चोरले. त्यानंतर त्याच्या मनात पैशांची हाव निर्माण झाली आणि त्याने खरातला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
पाच कोटींची खंडणी आणि अशी झाली पोलीसांत तक्रार
या व्हिडीओच्या माध्यमातून नीरज आणि त्याच्या साथीदारांनी अशोक खरातकडे ५ कोटी रुपये मागितले. परंतू, खरातने त्याला दाद दिली नाही. त्यामुळे नीरजने पीडित महिलांना घेरलं आणि शिर्डीतील एका २४ वर्षीय विवाहितेचे मॉर्फ फोटो आणि काही व्हिडीओ तिलाच व्हॉट्सअॅपवर पाठवून धमकी दिली. याबाबत तिने खरातला सांगितले असता त्यांनी स्वत:च्या बचावासाठी तिला पोलिसात जाण्यास सांगितलं. आपल्या हाती काही लागत नसल्याचं लक्षात आल्यानंतर नीरजने ते व्हिडीओ संबंधित महिलेच्या मेहुण्याला पाठवले. त्यानंतर पीडित महिलेने सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये अशोक खरातविरोधात तक्रार दिली आणि त्याचं काळं कृत्य उघड झालं.
हेही वाचा : ५८ व्हिडिओंचा पेन ड्राईव्ह, राजकारणी-सेलिब्रीटींशी कनेक्शन, कॅप्टन अशोक खरात प्रकरणाची A to Z माहिती...
शंभरहून अधिक व्हिडिओ उपलब्ध
धक्कादायक बाब अशी की, या भोंदू अशोक खरात याच्या लैंगिक शोषणाचे ५८ नाही तर १०० हून अधिक व्हिडीओ असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात याच्याकडे आलिशान बंगले, फार्म हाऊस, जमिनी, सोने, चांदी, महागड्या गाड्या अशी एकून २०० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा संशय आहे. दुसरीकडे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे अशोक खरातसोबतचे आणखी काही फोटो व्हायरल झाल्याने त्यांच्यावर राजकीय वर्तुळातून प्रचंड टीका होत आहे. उबाठा गटाच्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे, सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी चाकणकरांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर, अनेकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येतीये.
संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी पक्षाची भूमिका काय?
या प्रकरणावर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रफुल पटेल यांनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, "भोंदू बाबाचे प्रकरण अतिशय वाईट असून त्याच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे. जे लोक त्याच्यासोबत या कामात सहभागी असतील आणि त्यांचे नाव तपासात पुढे आल्यास त्यांच्यावर कारावाई केली पाहिजे. काही राजकीय नेत्यांचीही नावे यात जोडली गेली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही त्यांच्यावर योग्य कारवाई करणार असून येत्या एक दोन दिवसांत ते दिसेल. आमच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत. पक्ष यावर नक्कीच योग्य कारवाई करेल."
पुढील धागेदोरे बाहेर येणार?
दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनीही अशोक खरातवर गंभीर आरोप केले आहेत. खरातने त्यांना धमकी दिल्याचा त्यांचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी महिला आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी पथक स्थापन करण्यात आले असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी त्यांची भेट घेतली. मात्र, रुपाली चाकणकर यांनी दोन दिवसांपूर्वी यावर केवळ एक ट्विट करत स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर त्या माध्यमांसमोर आल्या नाहीत किंवा त्यांनी यासंदर्भात एखादी पोस्टही केली नाही. रुपाली चाकणकर यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्यावर विरोधक तुटून पडल्याचे दिसत आहेत. अशोक खरात याच्या सखोल चौकशीनंतर या संपूर्ण प्रकरणाचे आणखी काही धागेदोरे आणि धक्कादायक बाबी पुढे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.