राज्याच्या वर्तुळात सध्या कॅप्टन अशोक खरात हे नाव चांगलंच चर्चेत आहे. नाशिक येथे तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि अशोक खरात याला अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यात अटक झाल्यानं मोठी खळबळ उडालीये. विशेष म्हणजे या इसमाचा राजकीय वर्तुळात वावर असल्याच्या चर्चांनी या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालंय. आत्तापर्यंत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर अपडेट्स...
अशोक खरात याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या एका पेन ड्राईव्हमध्ये तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आले असून यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. शिवाय या संपूर्ण प्रकरणाच्या निमित्ताने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचंही नाव पुढे आलंय. तर, हा भोंदूबाबा अशोक खरात नेमका कोण आहे? त्याला अटक कशी झाली? रूपाली चाकणकर यांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे?, असे मुद्दे चर्चेत आले.
कोण आहे अशोक खरात?
अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असून तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झालाय. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जात असल्याचं समजतंय. स्वतःला 'कॉस्मोलॉजी' तज्ज्ञ आणि भविष्यवेत्ता म्हणवून घेणाऱ्या 'कॅप्टन' अशोक खरात याला १७ मार्च रोजी नाशिकच्या सरकारवाडा गुन्हे शाखेच्या पोलीसांनी अत्याचाराच्या आरोपाखाली अटक केलीये.
प्रकरण नेमकं बाहेर कसं आलं?
एका ३५ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर अशोक खरातच्या कृत्यांची पोल खोल झाली असून न्यायालयाने त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीये. मात्र, पोलिसांना त्याच्या ऑफिसमधून मिळालेल्या पुराव्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. शिवाय अशोक खरातचे रूपाली चाकणकर यांच्यासह अनेक बड्या राजकीय नेत्यांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण मिळालंय.
२०१९मध्ये नेमकं काय घडलं होतं?
पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, २०१९ मध्ये तिची भोंदू अशोक खरातशी ओळख झाली आणि त्याने तिचा विश्वास संपादन करत दैवी शक्ती असल्याचा दावा केला. त्यानंतर तिला वारंवार त्याच्या ऑफिसमध्ये बोलावून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, महिलेने सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये खरातविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी खरातच्या कार्यालयावर छापा टाकला असता, तिथे अनेक आक्षेपार्ह पुरावे हाती लागले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना एक पेन ड्राईव्ह सापडला असून त्यात ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ असल्याचं समजतं. अशोक खरातच्या फार्म हाऊसवरील झाडाझडती दरम्यान पोलिसांना एक पिस्तूल सापडलं आहे. तसेच काही वापरलेली आणि काही न वापरलेली (जिवंत) काडतुसे देखील जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.
राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकरांशी संबंध असल्याचा विरोधकांचा आरोप
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा अशोक खरातसोबतचा एक फोटो प्रचंड व्हायरल होतोय. यात रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातच्या डोक्यावर छत्री धरल्याचं दिसतंय. तर अशाच एका व्हिडीओमध्ये रुपाली चाकणकर या अशोक खरातचे पाद्यपूजन करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होतीये. तर, अशोक खरात याने स्थापन केलेल्या शिवनिका संस्थान ट्रस्ट या संस्थानवर रूपाली चाकणकर संचालक असल्याचाही आरोप आहे. मात्र, चाकणकर यांनी ट्विट करत या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केलीये.
शिवनिका संस्थान ट्रस्टवर चाकणकर सदस्य
"शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानचे ट्रस्ट असून काहीवेळा तिथे सामाजिक कार्यक्रम साजरे होतात, त्यामुळे सामाजिक कामांच्या निमित्ताने आम्ही अनेक जण ट्रस्टच्या कामाशी जोडले गेले होतो. ज्यात समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही, आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलिस निष्पक्षपणे चौकशी करतील, पोलिस तपासावर माझा पुर्ण विश्वास आहे," असं त्या म्हणाल्या.
एसआयटी चौकशी सुरू
या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली असून या पथकाच्या प्रमुखपदी महिला IPS अधिकारी तेजस्विनी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आलीये. त्यामुळे या चौकशीतून अशोक खरातच्या सगळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....