मुंबई : (Devendra Fadnavis) विधानसभा सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासात खर्ची होत असलेल्या अधिक वेळेची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रश्नोत्तराचा तास भाषण करण्यासाठी नसून छापील उत्तराच्या अनुषंगाने प्रश्न विचारा, अशा सूचना सर्व सदस्यांना दिल्या.
आ. महेश लांडगे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिले. त्यानंतर आ. राजेश पवार यांनी उपप्रश्न विचारताना नांदेड शहराचा प्रश्न मांडला.
हेही वाचा : गुजरातच्या धर्तीवर राज्यात आधुनिक ‘बसपोर्ट’ एसटी डेपोच्या विकासाला गती; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्तक्षेप करत म्हणाले की, “प्रश्नोत्तराचा तास हा लेखी उत्तरावर पूरक प्रश्नाकरिता असून भाषण देण्यासाठी किंवा राज्यभरातील प्रश्न विचारण्यासाठीही नाही. त्यामुळे जे उत्तर दिले आहे त्यावर आपला पूरक प्रश्न असेल तर तो विचारला पाहिजे. छापील उत्तराच्या अनुषंगाने प्रश्न विचारा. ही सवय प्रत्येकाने लावली पाहिजे, अशी माझी विनंती आहे,” अशा सूचना त्यांनी दिल्या.