गुजरातच्या धर्तीवर राज्यात आधुनिक ‘बसपोर्ट’ एसटी डेपोच्या विकासाला गती; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

    13-Mar-2026
Total Views |
 
मुंबई : (Pratap Sarnaik) " गुजरातच्या धर्तीवर राज्यात आधुनिक ‘बसपोर्ट’ उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून एसटी महामंडळाच्या डेपो आणि बसस्थानकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नवीन धोरण आखण्यात आले आहे."अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत दिली.

नियम ९२ अन्वये विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांनी याविषयी विधान परिषदेत अर्धा तास चर्चा उपस्थित केली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात आधुनिक आणि प्रवासी सुविधांनी सुसज्ज एसटी बसस्थानके उभारण्यात येणार आहेत."
 
हेही वाचा : USS Abraham Lincoln : 'अब्राहम लिंकन' या अमेरिकन युद्धनौकेवर इराणी हल्ला? पेंटागॉनने फोटोसह दिलं स्पष्टीकरण
 
"राज्यातील एसटी बस स्थानक व डेपोंच्या व्यावसायिक तत्वावरील विकास प्रकल्पांसाठी प्रत्यक्ष भाडेकरार ४९+४९ वर्षे म्हणजे ९८ वर्षे असा ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना प्रकल्प राबविण्यास प्रोत्साहन मिळेल आणि एस.टी. महामंडळालाही दीर्घकालीन आर्थिक उत्पन्न मिळेल. प्रवाशांनाही स्वच्छ, सुरक्षित व आधुनिक सुविधा उपलब्ध होतील. तसेच या प्रकल्पांमधून स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार व व्यवसायाच्या संधी निर्माण होतील."

या प्रकल्पांतर्गत केवळ शहरी भागांवर भर न देता संतुलित विकासावरही लक्ष देण्यात येणार आहे. त्यासाठी शहरी भागातील एक डेपो, तालुकास्तरावरील एक डेपो आणि ग्रामीण भागातील एक डेपो अशा तीन डेपोचे पॅकेज तयार करून निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील बसस्थानकांचाही विकास होणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.