आखातातील युद्धाची संपूर्ण जगाला झळ

    11-Mar-2026   
Total Views |
War in West Asia
 
जग हे एक खेडे असल्याच्या सिद्धांताचा परिचय सध्या सुरु असलेल्या आखाती युद्धामुळे अवघ्या जगाला आला. इंधनाबरोबरच मालवाहतुकीवरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याने व्यापारही थंडावला. त्यामुळे या युद्धाची झळ संपूर्ण जगालाच बसली असून, दिवसेंदिवस त्याचे परिणाम अधिक प्रकर्षाने दिसू लागले आहेत. त्यामुळे हे युद्ध आणखीन लांबले, तर त्याचे अधिक गंभीर परिणाम जगाला भोगावे लागतील.
 
सुमारे दहा दिवसांच्या अनिश्चिततेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी "अमेरिका विजयाच्या समीप असून लवकरच हे युद्ध थांबेल,” अशी घोषणा केली. त्यामुळे बॅरलला १५० डॉलरकडे वाटचाल करणारे खनिज तेलाचे भाव १०० डॉलरपेक्षा कमी झाले. जमिनीवर हे युद्ध थांबण्याची कोणतीही शक्यता दिसत नसताना, तसेच यापूर्वी ट्रम्प यांनी हे युद्ध काही आठवडे, कदाचित काही महिने चालण्याची शक्यता वर्तवली असताना, या एका वक्तव्यामुळे शेअर बाजारासह सर्वांनाच हुरुप आला. दि. २८ फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह इराणच्या लष्करी नेतृत्वातील ४० हून अधिक वरिष्ठ अधिकारी मारले गेले. मिनाब येथील नाविक तळाला लक्ष्य करण्याच्या प्रयत्नांमध्ये अमेरिकेचे ‘टॉमाहॉक’ क्षेपणास्त्र एका मुलींच्या शाळेवर पडले. या हल्ल्यामध्ये अनेक लहान मुलींसह १५० हून अधिक लोक मारले गेले. इराणने इस्रायलसकट अमेरिकेचे लष्करी किंवा नाविक तळ असणार्‍या सर्व मित्रदेशांविरुद्ध क्षेपणास्त्रे, तसेच ड्रोनचा मारा सुरू केला. या हल्ल्यांमध्ये सात अमेरिकन सैनिक मारले गेले.
 
इराणवरील हल्ल्यांमध्ये मारल्या गेलेल्या लोकांची संख्या १ हजार, ३०० हून अधिक असली, तरी त्यात मुख्यतः इराणमधील इस्लामिक राजवटीशी संबंधित लोकांचा समावेश असल्याचे अमेरिका आणि इस्रायलने म्हटले आहे. इस्लामिक राजवटीच्या गेल्या ४७ वर्षांच्या काळात पाश्चिमात्य देशांकडून विविध प्रकारचे निर्बंध असल्यामुळे इराणचे हवाई दल, तसेच शस्त्रास्त्रे अनेक दशके जुनी होती. इराणची बरीचशी लढाऊ विमाने, तसेच नौदलाची जहाजे या युद्धामध्ये बुडवली गेली. त्यात हिंदी महासागरात श्रीलंकेच्या किनार्‍याजवळ आंतरराष्ट्रीय समुद्रात बुडवलेल्या ‘इरिस देना’ या युद्धनौकेचाही समावेश आहे. असे असले तरी, निर्बंधांच्या काळात इराणने मोठ्या प्रमाणावर दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे, तसेच ड्रोनची निर्मिती केली होती. इराणच्या ‘शहीद’ ड्रोननी सर्व आखाती देशांमध्ये दहशत निर्माण केली. या ड्रोन हल्ल्यांमध्ये मारल्या गेलेल्यांची संख्या फारशी नसली, तरी त्यांनी आखाती देशातील अमेरिकेचे दूतावास, सैन्यतळ, विमानतळ, तेलशुद्धीकरण प्रकल्प आणि पर्यटनकेंद्रांना लक्ष्य केले. आखाती देशांकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे असली, तरी त्यांना युद्ध लढण्याचा अनुभव नाही. गेल्या काही दशकांमध्ये कतार आणि संयुक्त अरब अमिरातींमध्ये प्रचंड समृद्धी आली आहे. संयुक्त अरब अमिरातींची लोकसंख्या दहा लाखांपासून वाढून एक कोटींच्या वर गेली आहे. २०२५मध्ये या देशात गृहनिर्माण क्षेत्रात २५० अब्ज डॉलरचे व्यवहार झाले. त्यातील २३ टक्के घरांची खरेदी भारतीयांनी केली. तीच गोष्ट तेथील तेल आणि नैसर्गिक वायूच्या व्यापारालाही लागू पडते.
 
इराण आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये पर्शियाच्या आखाताची रुंदी जेमतेम २० मैल असून, मोठ्या जहाजांच्या प्रवासासाठी तेथील जेमतेम दोन मैल रुंदीचा भाग सुयोग्य आहे. याचाच अर्थ, एका दिशेने वाहतुकीसाठी केवळ एक मैल एवढाच भाग योग्य आहे. या भागाला ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ म्हटले जाते. या भागातून जगातील २० टक्के खनिज तेल, २५ टक्के नैसर्गिक वायू आणि २५ टक्के खतांची वाहतूक होते. भारताच्या एकूण गरजेपैकी सुमारे ५० टक्क्यांहून अधिक इंधन पुरवठा या भागातून केला जातो. इराणने हा भाग बंद करत असल्याची घोषणा करून या भागातून वाहतूक करणार्‍या जहाजांना, तसेच तेलाच्या टँकरवर हल्ले करायला सुरुवात केली. त्यामुळे विमा कंपन्यांनी आपले हात वर केले. गेला आठवडाभर होर्मुझचे आखात बंद असून त्याचा जागतिक तेल, नैसर्गिक वायू आणि अन्नधान्याच्या व्यापारावर परिणाम झाला आहे. अमेरिका तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण असल्याने या टंचाईची अमेरिकेला फारशी झळ बसणार नसली, तरी तेलाचे भाव वाढल्याने अमेरिकेतील निवडणुकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. इराणकडे पाच हजारांहून अधिक समुद्री सुरुंग असून, ते पेरल्यास आखातातील वाहतूक सुरू करायला काही महिने लागू शकतात.
 
आखाती देश समुद्राच्या शुद्ध केलेल्या पाण्यावर अवलंबून आहेत. इराणमध्ये पाच टक्के पाण्याचा पुरवठा समुद्राच्या पाण्याच्या शुद्धीकरणाद्वारे होत असला, तरी संयुक्त अरब अमिराती, बहारीन आणि कतारमध्ये हेच प्रमाण ८० ते ९० टक्के आहे. युद्धादरम्यान आपल्या जलशुद्धीकरण प्रकल्पावर हल्ला झाल्याचे घोषित करून इराणने आपण त्याचे प्रत्युत्तर देणार असल्याचे सांगितले. पाठोपाठ बहारीन येथील जलशुद्धीकरण प्रकल्पावर हल्ला करण्यात आला. जर समुद्राच्या पाण्याच्या निक्षारीकरण प्रकल्पांना लक्ष्य करण्यात आले, तर अनेक आखाती देशांच्या भविष्यासमोर गंभीर प्रश्न निर्माण होईल. या युद्धामध्ये इराणच्या तुलनेत आखाती अरब देशांचे लष्करीदृष्ट्या खूप कमी नुकसान झाले आहे. अमेरिकेकडून विकत घेतलेल्या ‘हवाई हल्ले प्रतिरोधक यंत्रणे’मुळे या देशांना इराणकडून येणारे जवळपास ९५ टक्के ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हवेतल्या हवेत नष्ट करणे शक्य झाले. असे असले तरी, या क्षेपणास्त्रांची संख्या मर्यादित आहे. वर्षभरात सुमारे ९६ ‘थाड’ आणि ५०० ते ६२० ‘पॅट्रियट’ क्षेपणास्त्रांची निर्मिती केली जाते. इराणकडून येणारे क्षेपणास्त्र हवेतल्या हवेत नष्ट करण्यासाठी दोन ‘पॅट्रियट’ क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात येतो.
 
त्यामुळे हे युद्ध लांबल्यास आखाती देशांकडचा क्षेपणास्त्रांचा साठा संपण्याची भीती आहे. या युद्धाचा फायदा घेऊन चीनने तैवानवर हल्ला केल्यास त्याच्या संरक्षणासाठी पुरेशी क्षेपणास्त्रं आहेत का, असाही प्रश्न विचारण्यात येत आहे. युद्धाच्या पहिल्याच दिवशी इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांना ठार मारल्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी नेमताना इराणने अमेरिकेचे मत विचारात घ्यावे, अशी दर्पोक्ती डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. पण, इराणमधील धर्मगुरूंच्या मंडळाने अपेक्षेप्रमाणे खामेनी यांची पुत्र मोज्तबा यांची निवड केली. यातून इराणच्या धार्मिक नेतृत्वातही घराणेशाही सुरू होत आहे का, असा प्रश्न विचारला जात असला, तरी या निर्णयामागे एक रणनीती आहे. अली खामेनी ८६ वर्षांचे असल्यामुळे फारसे सक्रिय नव्हते. इराणमधील धार्मिक व्यवस्थेत मवाळ आणि जहाल असे दोन गट असून, मोज्तबा जहाल गटात आहेत. त्यांचे ‘रिवॉल्युशनरी गार्ड’शी घनिष्ठ संबंध आहेत. यावर्षीच्या सुरुवातीला महागाई आणि बेरोजगारीला कंटाळून इराणमधील तरुणांनी केलेले आंदोलन चिरडून टाकण्यासाठी हजारो लोकांना ठार मारण्यात आले. या कारवाईमध्ये मोज्तबा सहभागी होते. या युद्धाच्या सुरुवातीला त्यांनासुद्धा मारण्याची योजना होती. त्यामुळे इराणच्या नेतृत्वाने आपण हा संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे सूचित केले आहे.
 
या युद्धामुळे भारताच्या शेजारी असलेल्या पाकिस्तान आणि बांगलादेशसह अनेक विकसनशील देशांचे कंबरडे मोडले आहे. बांगलादेशमध्ये विद्यापीठांना सुटी घोषित करण्यात आली आहे. वरकरणी तेथे ईदची सुटी वाढवण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात सरकारला शेख हसीनांच्या सरकारविरोधात झाले तशा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची भीती आहे. पाकिस्तानमध्ये एका दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत ५५ रुपयांची वाढ करण्यात आली. तिथेही प्रत्यक्ष वर्गाऐवजी ऑनलाईन उच्च शिक्षण सुरू करण्यात आले असून, एवढ्यावरच न थांबता, सर्व मंत्री, त्यांचे सल्लागार आणि सचिवांचे दोन महिन्यांचे पगार कापण्यात आले आहेत. कार्यालयांनी अर्ध्या कर्मचार्‍यांना घरून काम करायला सांगितले असून सरकारी कर्मचार्‍यांच्या इंधनभत्त्यातही अर्ध्याहून अधिक कपात करण्यात आली आहे. या परिस्थितीत भारत स्थिर आहे.
 
आखाती युद्धामुळे महागाई वाढेल, तसेच काही प्रमाणात स्वयंपाकाच्या इंधनाची टंचाई जाणवणार असली, तरी त्यातूनही मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पर्शियाच्या आखातातून भारतीय युद्धनौकांच्या देखरेखीखाली भारताला नैसर्गिक वायू पुरवणार्‍या जहाजांच्या वाहतुकीसाठी भारत इराण आणि अमेरिकेशी बोलणी करत आहे. हे युद्ध आणखी लांबले, तर संपूर्ण जगाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत.
 
 
 

अनय जोगळेकर

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणाचे अभ्यासक असून राजकीय घडामोडींचे विश्लेषक आणि विशेष प्रकल्पाधिकारी म्हणून ते गेली १२ वर्षं कार्यरत आहेत. वाणिज्य शाखेतील पद्व्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली आहे. एकात्मिक जलव्यवस्थापन या विषयात ते मुंबई विद्यापीठातून पीएचडी करत आहेत.  इंटरनेट, तंत्रज्ञान, समाज माध्यमं आणि जागतिकीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. संगणकीय मराठी आणि भारतीय भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञान सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी काम केले असून सध्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळात ते अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मुक्त स्तंभलेखक म्हणून ते गेली ८ वर्षं विविध वर्तमानपत्र तसेच ब्लॉगच्या माध्यमातून लिहित आहेत.