४० वर्षांचे स्वप्न साकार होणार! कोल्हापूर–वैभववाडी रेल्वे मार्गाची प्रतीक्षा संपली

05 Feb 2026 12:27:59
Kolhapur–Vaibhavwadi Rail Project
 
मुंबई : (Kolhapur–Vaibhavwadi Rail Project) केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी केलेल्या तरतुदीपैकी ३० हजार कोटी रुपये महाराष्ट्राला मिळणार आहेत. त्यातूनच बहुप्रतीक्षित कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे प्रकल्पाला गती मिळणार आहे. याच निधीतून कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाला केंद्र शासनाचा हिस्सा असलेल्या ३ हजार ४११ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद होणार आहे. त्यासह राज्य शासनही आपला हिस्सा तत्काळ देणार असून लवकरच या मार्गाच्या भूसंपादनाला सुरुवात होणार आहे.
 
कोल्हापूरची कोकण रेल्वेला जोड मिळावी ही गेल्या ४० वर्षांपासूनची मागणी होती. दि.२५ फेब्रुवारी २०१६ रोजी रेल्वेच्या अर्थसंकल्पात तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ३ हजार २४४ कोटींच्या या मार्गाला मंजुरी देत निधीचीही तरतूद केली. केंद्र आणि राज्य शासनाच्या हिस्सेदारीतून हा प्रकल्प उभारला जाईल, असे त्यावेळी स्पष्ट करण्यात आले होते. या मार्गाचे सर्व्हेक्षण, डीपीआर, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आदी विविध प्रक्रिया पूर्ण झाल्या. मात्र, यामध्ये सुमारे पावणेदहा वर्षांचा कालावधी गेला. मात्र बहूप्रतीक्षित असलेल्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाच्या कामाला पुढील वर्षी २०२७ साली प्रारंभ होणार आहे.
 
हेही वाचा : Mumbai-Pune Expressway : मुंबईकर-पुणेकर कोंडींत! अत्यावश्यक सेवाही ठप्प! १५ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, महिला-बालकांचे हाल!
 
२७ बोगदे, ५५ उड्डाणपूल
 
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, पन्हाळा, गगनबावडा या तालुक्यांतून आणि कोकणातील वैभववाडी तालुक्यातून जाणारा हा मार्ग निसर्गाच्या कुशीतून जाणार आहे. या मार्गावर २८ कि.मी. लांबीचे एकूण २७ बोगदे असतील. सर्वात मोठा बोगदा ३.९६ कि.मी. लांबीचा आहे. २ कि.मी.पेक्षा जादा लांबीचे ३ तर त्यापेक्षा कमी लांबीचे २४ बोगदे असतील. या मार्गावर रस्त्यावरील ५५ उड्डाणपूल, रस्त्याखालील ६८ पूल असतील. यासह छोटे पूल ७४ तर मोठे पूल ५५ असतील. या मार्गावर एकूण दहा स्थानकेही प्रस्तावित आहेत.
 
हे वाचलत का?-  Korean Love Game : धक्कादायक! ऑनलाईन गेमच्या नादात तीन सख्ख्या बहिणींनी संपवलं जीवन; नेमकं काय घडलं?
 
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या तरतुदींमुळे कोकणच्या अर्थकारणाला मोठी गती मिळणार आहे. विशेषतः कोल्हापूर-वैभववाडी या ६,५०० कोटींच्या रेल्वे प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकार ५०-५० टक्के खर्च उचलणार असून, ३,२४४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया ९ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचे नियोजन असून, २०२८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हा मार्ग कोकणला थेट पश्चिम महाराष्ट्राशी जोडून व्यापाराचे नवे दालन उघडेल.
 
- नितेश राणे, मंत्री, मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास
 
 
Powered By Sangraha 9.0