मुंबई : (Korean Love Game) उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 'कोरियन लव्हर' या ऑनलाईन गेमच्या नादात तीन सख्ख्या बहिणींनी एका निवासी इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. टास्क पूर्ण करण्यासाठी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. निशिका (१६), प्राची (१४) आणि पाखी (१२) अशी मृत बहिणींची नावे असून त्यांनी सामूहिकरित्या टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.(Korean Love Game)
गेममध्ये टास्क मिळाल्याचा दावा
कुटुंबातील सदस्यांच्या मते, या तिन्ही बहिणींना ऑनलाइन कोरियन लव्हर गेम खेळण्याचे व्यसन लागले होते. त्या या खेळाच्या आहारी गेल्या होत्या. गेमच्या शेवटच्या टप्प्यात त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शेवटच्या वेळी भेटणे आणि सर्वांचे फोटो काढणे समाविष्ट होते. त्यानंतर, सर्वांना एका खोलीत बंद करायचे होते. त्यानंतर, कोरियन ऑनलाइन गेममध्ये आत्महत्या करण्याचा टास्क होता, असा दावाही करण्यात येत आहे. यानुसार, तिन्ही बहिणी रात्री आपल्या खोलीतून बाहेर पडल्या, घरातील देवघराच्या खिडकीजवळ गेल्या आणि खिडकी उघडली. खिडकीजवळ ठेवलेल्या खुर्चीच्या सहाय्याने त्यांनी एकामागोमाग एक खाली उडी मारल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.(Korean Love Game)
मला खरंच माफ करा. सॉरी पप्पा!
या घटनेनंतर त्यांच्या आईवडिलांना घरात एक चिठ्ठी सापडली. काचेवर चिकटवलेल्या या चिठ्ठीत True Life Story असे लिहिले असून त्यावर एक सॅड इमोजी काढलेला होता. हिंदी-इंग्रजी अशा मिश्र भाषेत लिहिलेल्या चिठ्ठीत, "या डायरीमध्ये जे काही लिहिलं आहे, ते सर्व वाचा कारण हे सर्व खरं आहे. आताच वाचा! मला खरंच माफ करा. सॉरी पप्पा!" असा मजकूर लिहिला आहे.(Korean Love Game)
या संदर्भात शालिमार गार्डनचे सहाय्यक पोलीस आयुक्त अतुल कुमार सिंह यांनी सांगितले की, "पोलीस रिस्पॉन्स व्हेईकलला पहाटे २.१५ वाजता गाझियाबादच्या भारत सिटी सोसायटीमधील निवासी इमारतीच्या नवव्या मजल्यावरुन तीन मुलींनी उडी मारल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर निशिका, प्राची आणि पाखी या चेतन कुमार यांच्या मुली असल्याचे निष्पन्न झाले. त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांना लोनी येथील रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले."(Korean Love Game)
मुलींच्या खोलीत नेमकं काय मिळालं?
दरम्यान, पोलिसांनी तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून चिठ्ठी, चिट्ठीत उल्लेख केलेली डायरी तसेच संबंधित ऑनलाइन गेमिंग अॅपशी निगडित डिजिटल पुरावे तपासले जात आहेत. कोरियन ऑनलाइन मोबाइल गेमच्या नमुन्यातील छायाचित्रे त्यांच्या खोलीत विखुरलेली आढळली. ऑनलाइन गेमिंगचा प्रभाव, कौटुंबिक परिस्थिती आणि मानसिक आरोग्य या सर्व बाबींचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.(Korean Love Game)
काय आहे कोरियन लव्ह गेमचा सापळा?
कोरियन लव्ह गेम हा कोणताही साधा मनोरंजनाचा खेळ नसून तो एक ऑनलाईन टास्क बेस्ड इंटरएक्टिव्ह गेम आहे. "We are not Indians, we are Koreans" असे या गेमचे मुख्य ब्रीदवाक्य आहे. हा गेम सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि मेसेजिंग ॲप्सच्या माध्यमातून पसरवला जातो. या गेममध्ये दुसऱ्या बाजूला बसलेली व्यक्ती स्वतःला एक सुंदर कोरियन किंवा परदेशी नागरिक असल्याचे सांगते. मुलांचा विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीची चर्चा मैत्री आणि प्रेमाच्या अवतीभवती फिरते.(Korean Love Game)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\