दारकरी कोळ्यासारख्या दुर्लक्षित जीवावर लक्ष केंद्रित करून नुकत्याच त्याच्या नव्या प्रजातीचा उलगडा करणार्या सत्पाल केरप्पा गंगलमाले याच्याविषयी...
सत्पालचा जन्म दि. १९ ऑक्टोबर, १९९३ साली सांगोला जिल्ह्यातील लक्ष्मीनगर गावात झाला. गंगलमाले हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंब. विस्तीर्ण माळ पालथा घालून ओढ्यातून मार्ग काढत रोज शाळेला जाणे, हा सत्पालचा नित्यक्रम. यातूनच तो विस्तीर्ण माळ सत्पालचा वाटाड्या झाला. त्याला वेगवेगळे पक्षी आणि खुणावणारा निसर्ग दाखवण्याचे काम माळाने केले. म्हणून आजही सत्पालच्या मनात माळाविषयी एक ओलावा आहे. सत्पालने पहिलवान व्हावे, अशी वडिलांची इच्छा होती. याशिवाय, गावातील सामाजिक मानसिकताही स्पर्धा परीक्षांमध्येच मुलांचे भले होते, अशीच होती. त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या आकांक्षाचे ओझे घेऊन सत्पाल महाविद्यालयीन शिक्षणाकरिता कोल्हापुरात आला.
कोल्हापुरात आल्यावर त्याला कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणाकरिता विवेकानंद महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला. स्पर्धा परीक्षेच्या तयारीदरम्यान, सत्पालचा ‘वाणी कौशल्य’ अभ्यासक्रम सुरू झाला. हा अभ्यासक्रम शिकवणारे शिक्षक हिमांशू स्मार्त यांना पक्षीनिरीक्षणाची आवड होती. त्यांच्यामागे सत्पालदेखील पक्ष्यांच्या शोधात फिरू लागला. रंकाळाच्या तळ्यावर त्याची पक्षीशोधाची मोहीम सुरू झाली. मात्र, पाहता-पाहता ही शोधमोहीम त्याला पुन्हा कधी निसर्गाच्या वाटेवर घेऊन आली, हे त्यालादेखील कळलेच नाही. तोपर्यंत त्याने कला शाखेतील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते. काहीकाळ शिक्षणात खंड पडला होता. इथेच पुन्हा त्याची निसर्गाशी गट्टी जमली. स्पर्धा परीक्षांचे असलेले सामाजिक आशेचे ओझे गुंडाळून त्याने निसर्गातच काम करण्याचे ठरवले आणि विज्ञान शाखेतील पुढील शिक्षणास सुरुवात केली.
२०१७ साली सत्पालने विज्ञान शाखेतील पदवीच्या शिक्षणास सुरुवात केली. मात्र, या काळात त्याने निसर्गाच्या प्रात्यक्षिक ज्ञानसंपादनाकडे अधिक भर दिला. निरनिराळ्या जंगलात जाऊन फिरणे, प्रजातींना केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात येणार्या कार्यशाळांमध्ये सहभागी होणे, हे तो हिरिरीने करू लागला. प्रसिद्ध होणारे जीवशास्त्रीय शोधनिबंध वाचणे, त्याविषयी संशोधकांकडून मार्गदर्शन मिळवणे हेदेखील दुसर्या बाजूला सुरू होते. यातूनच त्याची ओळख सरीसृप संशोधक अक्षय खांडेकर यांच्यासोबत झाली. खांडेकर यांच्यामुळे सत्पालला सरीसृपांचे जग कळले. आंबोली येथे पार पडलेल्या जैवविविधता महोत्सवात सहभागी झाल्याने डॉ. वरद गिरी आणि इतर संशोधकांमुळे त्याच्यासमोर सरीसृप जगाची कवाडे खुली झाली. सरीसृपांचे निरीक्षण करण्यासाठी त्यांना पकडणे आवश्यक होते. मात्र, लहानपणापासून सरीसृपांविषयी मनात दडलेली एक भीती होती. ही भीती चेपून एकदा सत्पालने रंकाळा तलावावरच एक पाल पकडली. खांडेकर यांच्यामुळे पालींवर अधिकाधिक लक्ष केंद्रित झाले. पालींच्या वर्गीकरणशास्त्राकडे अधिक लक्ष वळले.
‘लॉकडाऊन’च्या या काळात सत्पाल आपल्या गावी सांगोल्यात होता. त्या मोकळ्या काळात सत्पाल माळावरील बेडूक पकड, आवाजावरून त्याची ओळख पटव, अशी कामे करत होता. मात्र, एका विलक्षण जीवाने त्याचे लक्ष वेधून घेतले. हा जीव होता ‘ट्रॅपडोअर स्पायडर’ म्हणजेच ‘दारकरी कोळी.’ मातीत बीळ खणून त्याच्या तोंडावर दार तयार करण्यासाठी हे कोळी ओळखले जातात. प्रामुख्याने जंगलात सापडणारे हे कोळी माळावरदेखील चांगल्या संख्येत आढळतात. याच कोळ्यांचे कुतूहल माळामुळे सत्पालच्या मनात पुन्हा जागृत झाले. दारकरी कोळ्याची जीवशास्त्रीय रचना, त्याचे वर्तन याविषयीचे निरीक्षण आणि संशोधन निबंध चाळण्यास त्याने सुरुवात केली. यातून या जीवावर फार कमी अभ्यास झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे ‘लॉकडाऊन’ संपल्यानंतर सत्पालने आपले पूर्ण लक्ष दारकरी कोळ्याच्या संशोधनावर केंद्रित केले. यासाठी तो ‘ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन’मध्ये रुजू झाला.
सध्या सत्पाल दारकरी कोळ्याच्या या कुळावर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामधून ‘पीएचडी’ पूर्ण करत आहे. प्रा. डॉ. सुनील गायकवाड हे या अभ्यासक्रमाचे मार्गदर्शक आहेत. उत्तर पश्चिम घाटामधील ‘इडिओपिडे’ या कुळाची विविधता, विभागणी यांचा अभ्यास तो ‘पीएचडी’च्या माध्यमातून करत आहे. ‘ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन’च्या माध्यमातून लागलेल्या ११ नव्या प्रजातींच्या शोधामध्ये त्याचा सहभाग आहे. यामधील सात पाली आणि दोन विंचवांच्या प्रजातींच्या संशोधनामध्ये त्याने सहसंशोधक म्हणून काम केले आहे. महत्त्वाचे म्हणजे, याव्यतिरिक्त त्याने दारकरी कोळ्याच्या दोन नव्या प्रजातींचादेखील शोध लावला आहे. भविष्यात त्याला दारकरी कोळ्यांचा जीवशास्त्रीय अभ्यास करण्यामध्येच रस आहे. पुढील वाटचालीकरिता त्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!