मुंबई : (Devendra Fadnavis) मराठी भाषा महाराष्ट्रातील दर ५-७ किलोमीटरवर बदलते. पण प्रत्येक भागातल्या मराठीचा गोडवा आपल्याला कायम ठेवायचा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवनात आयोजित 'जावे विनोदाच्या गावा' या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यासह आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “विधिमंडळ हेदेखील एकप्रकारे विनोदांना जन्म देणारी जागा असते. संपूर्ण राजकीय क्षेत्र आणि इथे घडणाऱ्या घटना, विनोद आपण कमी केले, तर कदाचित मराठी नाटक-चित्रपट यांच्या कथानकांमध्ये ५० टक्के घट येईल. इतका मसाला आपण सगळे मिळून साहित्यिकांना देत असतो. त्यामुळे आपणदेखील साहित्याची निर्मिती करत असतो.”
छत्रपती शिवरायांनी स्वभाषेचा अभिमान शिकवला
“पूर्वीच्या काळात विधानमंडळातील भाषणांमध्ये विनोद, कोट्या, व्यंग अशा अनेक छटा पाहायला मिळायच्या. अलिकडच्या २०-२५ वर्षांत विलासराव, गोपीनाथ मुंडे यांच्या भाषणांमध्ये एकमेकांवर केलेल्या कोट्या, त्यातून निर्माण होणारे विनोद बघितले. पण दुर्दैवाने अलिकडच्या काळात अनेकवेळा विनोदाला अस्मितेशी जोडले जाते. त्यामुळे त्या विनोदातले मर्म निघून जाते. माणूस हल्ली घाबरून-घाबरून विनोद करू लागला आहे. यातून काय अर्थ निघेल आणि दिवसभर माध्यमांमध्ये काय चालेल, त्यामुळे त्या विनोदातील मर्म निघून जाते. आपल्या भाषणांतला निखळ आनंद कमी झालेला आहे. मराठी साहित्याने, मराठी भाषेने आपल्याला मोठे साहित्य आणि विचार दिले आहे. छत्रपती शिवरायांनी आपल्याला स्वभाषेचा अभिमान शिकवला. मराठी भाषा शुद्ध व्हावी, यासाठी त्यांनी शब्दकोश तयार केला. त्यामुळे त्यांच्यापासूनच भाषेचा अभिमान सुरु होतो. पंतप्रधान मोदी यांनी मराठीला राजाश्रय देत दिला अभिजात भाषेचा दर्जा दिला.”
हेही वाचा : छत्रपती शिवरायांचे स्थान भारतीय इतिहासात अद्वितीय; टीपूला त्यांच्यापेक्षा मोठे मानणे चुकीचेच!
विदर्भातून मुंबईत आल्यावर फार अडचणी
“मराठी भाषा महाराष्ट्रातील दर ५-७ किलोमीटरवर बदलते. माझ्यासारखा विदर्भातील माणूस मुंबईला आल्यानंतर फार अडचणी होत्या. कारण शब्दाशब्दाला ‘का बे’, ‘साल्या’ असे ‘सांस्कृतिक’ मराठी मी बोलायचो. पण येथे आल्यावर मला लक्षात आले की, ही संस्कृती मुंबईला पटण्यासारखी नाही. पुण्यात तर आपल्याला बहिष्कृतच केले जाईल. त्यामुळे मी हळूहळू स्वत:ला चांगले मराठी कसे बोलता येईल या नेले. पण प्रत्येक भागातल्या मराठीचा गोडवा आपल्याला कायम ठेवायचा आहे.”
मराठीला ज्ञानभाषेत रूपांतरित करून पुढे नेऊ
“आज आपण मराठीचा गौरव करत आहोत. यानिमित्ताने आपली भाषा, लोककला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवी यासाठी प्रयत्न केला पाहिजे. लोकसाहित्य, लोककला, लोकनाट्य, लोकगीते आपल्याला जिवंत कशी ठेवता येतील हे बघावे लागेल. जगाच्या पाठीवर त्याच भाषा जिवंत राहतात, ज्या ज्ञानभाषा आणि व्यवहार भाषा होतात. जगात इंग्रजी सर्वात मोठी भाषा आहे. कारण ती राज्यकर्त्यांची भाषा होती. राज्यकर्त्यांची भाषा ही जगाची भाषा होते. त्यामुळे आपणही आपल्या भाषेला ज्ञानभाषेत रुपांतरीत करून मराठीला पुढे न्यावे लागेल. मराठी बोलणाऱ्या व्यक्तीला मराठीमुळे प्रगती करता येते, असा भाव जागृत केल्यावर भविष्यातील मराठीला मोकळी वाट तयार करून देऊ,” असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.