उबाठाला वजा करून शरद पवारांचा मार्ग सुकर करण्याची राऊतांची धडपड; नवनाथ बन यांची टीका

21 Feb 2026 15:57:57
Navnath Ban
 
मुंबई : (Navnath Ban) राज्यसभेचे गणित मांडताना उबाठाला वजा करून शरद पवारांचा मार्ग सुकर करण्याची धडपड संजय राऊत करत आहेत. उबाठाच्या कोट्यात एक जागा असताना आता प्रियांका चतुर्वेदी राज्यसभेवर गेल्या तर, कार्यकाळ संपल्यानंतर राऊतांचा पत्ता कट होणार हे माहिती असल्याने राऊतांचा हा डाव आहे, अशी टीका भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केली.
 
नवनाथ बन म्हणाले की, "मराठीचा मुद्दा उपस्थित करून प्रियांका चतुर्वेदी यांचा राज्यसभा निवडणुकीत पत्ता कट करण्याची संजय राऊत यांची चाल आहे. रोटेशनचा मुद्दा पुढे करत यावेळी राज्यसभेवर शिवसेनेचा खासदार असेल असे विधान आदित्य ठाकरे करत असले तरी राऊतांची तशी इच्छा नाही. राज्यसभेच्या खासदारकीवरून आधी कधीही मराठी कार्ड न टाकणाऱ्या राऊतांनी अचानक यावेळी मराठी कार्ड खेळले आहे. प्रियांका या अमराठी असल्याने राऊतांचा हा डाव असून यावेळी राज्यसभेवर उबाठाला संधीच मिळू नये, हीच राऊतांची मनोमन इच्छा आहे."
 
हेही वाचा : CM Devendra Fadnavis : एआयच्या बळावर कृषीक्रांतीचा संकल्प
 
शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीने जळफळाट
 
"उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट झाल्याने उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचा जळफळाट झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे शत्रू आहेत की, मित्र यावर मतदारांनी शिक्कामोर्तब केले. ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेत असून बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्यापासून वाचवण्याचे काम करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे खरे शत्रू बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देणारे उद्धव ठाकरे आणि राऊत आहेत." असेही ते म्हणाले.
 
एसआयआरच्या माध्यमातून बोगस बांगलादेशी घुसखोरांची हकालपट्टी
 
"महाराष्ट्रातील निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर एसआयआरचे काम सुरू होत असून या माध्यमातून बोगस बांगलादेशी घुसखोरांची हकालपट्टी होईल आणि मतदारयादीचे शुद्धीकरण होईल. मतदार यादी सुधारण्याचा आग्रह करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी या अभियानाचे स्वागत करायला हवे. फक्त मराठी दुबार नावे उद्धव आणि राज यांच्या डोळ्यात खुपत होती."
 
 
Powered By Sangraha 9.0