काँग्रेसचे कृत्य म्हणजे भारतविरोधी कारवायांचे प्रदर्शन; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला संताप

21 Feb 2026 14:28:17
 
congress
 
मुंबई : काँग्रेसने भारत मंडपममध्ये जे केले ते त्यांच्या भारतविरोधी कारवायांचे प्रदर्शन आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला.
 
नवी दिल्ली येथे प्रगती मैदानावरील भारत मंडपममध्ये सध्या एआय इंडिया समिट सुरू आहे. यादरम्यान, शुक्रवारी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घुसखोरी करत जोरदार गोंधळ घातला. त्यांनी सुरक्षा व्यवस्था तोडत कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश केला आणि टी शर्ट काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी देश-विदेशातील अनेक प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते. या कृत्याबद्दल सर्व स्तरांतून काँग्रेसचा निषेध करण्यात येत आहे.
 
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एक्स अकाऊंटवरून संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, "काँग्रेसचे कृत्य अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद आहे. काँग्रेस पक्ष इतक्या खालच्या पातळीवर गेला आहे हे खूप लाजिरवाणे आहे. आज त्यांनी भारत मंडपममध्ये जे केले ते त्यांच्या भारतविरोधी कारवायांचे प्रदर्शन असून ते शिगेला पोहोचले आहे आणि ते पुन्हा एकदा उघड झाले आहे."
 
ही एक सुनियोजित रणनीती
 
"भारताच्या तंत्रज्ञान नेतृत्वाच्या ऐतिहासिक क्षणात जगासमोर अडथळा आणण्यासाठी ही एक पद्धतशीरपणे सुनियोजित रणनीती होती. हे खूप लाजीरवाणे आहे. आम्ही अशा घटनांचा तीव्र निषेध करतो. भारताचे नाव आणि सन्मान कलंकित करण्याच्या क्रूर प्रयत्नांसाठी दोषींवर कठोर कारवाई करावी," अशी मागणीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
 
हेही वाचा : AI Summit: ‘एआय समिट’मध्ये आठ वर्षीय रणवीर सचदेवची जादू! 
 
देशाला बदनाम करणाऱ्या काँग्रेसचा धिक्कार - मंत्री आशिष शेलार
 
"राहुल गांधी आणि काँग्रेसच्या विघातक राजकारणाने आता तळ गाठला आहे. जगासमोर देशाला अपमानित करण्याची एकही संधी राहुल गांधी सोडत नाहीत. परदेशात जाऊन देशाची बदनामी करणं ही त्यांची जुनीच सवय आहे, पण आता आपल्या देशात होत असलेल्या ‘AI इम्पॅक्ट समिट’ सारख्या जागतिक सन्मानाला गालबोट लावण्याचे घाणेरडे कारस्थान काँग्रेसने रचले आहे. ही कृती म्हणजे केवळ राजकीय आंदोलन नसून भारताची प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याचे जाणीवपूर्वक आखलेले षडयंत्र आहे. ‘AI इम्पॅक्ट समिट’ मध्ये केलेला हा नियोजित गोंधळ म्हणजे काँग्रेसच्या वैचारिक दिवाळखोरीचा जिवंत पुरावा आहे. ही परिषद भारतासाठी अभिमानाची बाब असताना, तिथे मुद्दाम अडथळे निर्माण करणे हे अत्यंत निषेधार्ह आहे. अशा प्रवृत्तींमुळे भारताचा सन्मान कमी होणार नाही, उलट देश अधिक खंबीरपणे जागतिक मंचावर आपले स्थान सिद्ध करेल हे निश्चित."
 
काँग्रेस दिशाहीन आणि वैचारिकदृष्ट्या दिवाळखोर - आ. अमीत साटम
 
"एआय इम्पॅक्ट समिटमध्ये युवा काँग्रेसने केलेला निषेध हा लोकशाही विरोध नव्हता तर भारताच्या जागतिक प्रतिष्ठेला कलंकित करण्याचा जाणीवपूर्वक आणि पूर्वनियोजित प्रयत्न होता. भारत एक मजबूत जागतिक नेता म्हणून उदयास येत असताना, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाच्या कृती राष्ट्रीय हिताच्या त्यांच्या वचनबद्धतेबद्दल गंभीर चिंता निर्माण करतात. पक्ष कार्यकर्त्यांना शिखर परिषदेसाठी नोंदणी करण्यास आणि नंतर आतून व्यत्यय निर्माण करण्यास सांगून, राहुल गांधी यांनी राजकीय चर्चा एका नवीन पातळीला नेली आहे, ज्यामुळे काँग्रेस दिशाहीन आणि वैचारिकदृष्ट्या दिवाळखोर असल्याचे उघड झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या निर्णायक नेतृत्वाखाली, भारत नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि राष्ट्र उभारणीत वेगाने प्रगती करत आहे, तर काँग्रेसने स्वतःला अराजकता आणि नकारात्मकतेचे प्रतीक बनवले आहे."
काँग्रेसचे कारस्थान कधीही यशस्वी होणार नाही - प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
 
"दिशाहीन, निर्लज्ज आणि वैचारिक दिवाळखोर नेतृत्व लाभल्यामुळेच काँग्रेस आता 'एआय' म्हणजेच 'अँटी इंडिया' झाली आहे. अशा काँग्रेसचा धिक्कार असो. 'एआय इम्पॅक्ट समिट' मधून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगाचे नेतृत्व करण्याच्या नव्या भारताच्या सामर्थ्याचे दर्शन घडत आहे. मात्र, दुसरीकडे काँग्रेसचे 'शहजादे' वैचारिक दिवाळखोरी आणि नकारात्मकतेच्या गर्तेत खोलवर रुतत चाललेत. प्रगतिपथावर असलेल्या भारताच्या तुलनेत त्यांची वाटचाल सध्या रसातळाच्या दिशेने सुरू आहे. 'एआय इम्पॅक्ट समिट' बदनाम करण्याचा हा कट पूर्वनियोजितच होता, हे आता सिद्ध झाले. काँग्रेस नेत्यांच्या मनात भारताचा द्वेष खोलवर भिनला आहे. याच द्वेषापोटी 'एआय इम्पॅक्ट समिट' सारख्या जागतिक सन्मानाला गालबोट लावण्यासाठी राहुल गांधींनी आपल्या गुंडांना मैदानात उतरवले. हे कृत्य म्हणजे भारताच्या प्रतिमेला कलंक लावण्याचा हलकटपणा आहे. काँग्रेसला लाभलेल्या राष्ट्रविरोधी वक्तव्ये आणि भूमिकांच्या लांच्छनास्पद मालिकेत आता आणखी एक कलंक जोडला गेला आहे. विकसित राष्ट्राच्या निर्मितीमध्ये अडथळे आणून अराजकता माजवण्याचे काँग्रेसचे कारस्थान कधीही यशस्वी होणार नाही."
 
 
Powered By Sangraha 9.0