AI Summit: ‘एआय समिट’मध्ये आठ वर्षीय रणवीर सचदेवची जादू!

    21-Feb-2026
Total Views |
 
AI Summit
 
मुंबई : (AI Summit) नवी दिल्लीमधील भारत मंडपममध्ये आयोजित ‘एआय इंडिया इम्पॅक्ट समिट -2026’ मध्ये एकीकडे काँग्रेस युथचे कार्यकर्ते गोंधळ घालत असतानाच, आठ वर्षांचा रणवीर सिंग सचदेव सर्वांच्या कौतुकाचा आणि कुतुहलाचा विषय ठरला. जागतिक नेते आणि अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सीईओ एकत्र आलेल्या या परिषदेमध्ये प्रमुख वक्त्यांच्या यादीमध्ये रणवीरच्याही नावाचा समावेश करण्यात आला होता. त्याचे वय, त्याची बुद्धिमत्ता आणि त्याचे ‘एआय’च्या क्षेत्रातील कार्य पाहून, परिषदेत तो चर्चेच्या केंद्रस्थानी होता. (AI Summit)
 
वयवर्षे अवघे आठ असलेल्या रणवीर सिंग सचदेवने त्याच्या भाषणामध्ये त्याचा ‘एआय’ विषयीचा अभ्यास जागतिक नेत्यांसमोर सादर करतानाच, प्राचीन भारतीय तत्वज्ञानाचा आधुनिक ‘एआय’शी कसा संबंध जोडता येईल, यावरही चर्चा केली. तसेच, इतर राष्ट्रांच्या विविध क्षेत्रातील ‘एआय’ प्रारुपावर देखील त्याने परिषदेच्या व्यासपीठावर सखोल चर्चा केली. तसेच, आपल्या भाषणादरम्यान भारतात तयार होणारी ‘एआय’ची विविध प्रारुपे, त्याचा भारताच्या जीडीपीवाढीसाठी होणारा लाभ तसेच, भारतात वाढणारी ‘एआय’ची साक्षरता यावरही चर्चा केली. त्याच्या ज्ञानाची मोहिनी ‘गुगल’चे सीईओ सुंदर पिचाई आणि ‘ओपन एआय’चे सॅम अल्टमन यांनाही पडली. म्हणून त्यांनीही परिषदेदरम्यान रणवीरची आवर्जून भेट घेऊन, त्याच्याशी चर्चा केली. (AI Summit)
रणवीरला लहानपणापासूनच तंत्रज्ञान क्षेत्राची आवड असून, तो सातत्याने ‘एआय’ क्षेत्रातील विविध माहिती आणि ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असतो. (AI Summit)
 
रणवीर एक तंत्रज्ञ, जागतिक लेखक आणि ‘एआय’ विषयावरील प्रभावी वक्तादेखील आहे. त्याने यापूर्वी भारतात झालेल्या ‘एआय फॉर गुड समिट’मध्येही भाग घेत, त्याचे विचार मांडले होते. ‘एआय फॉर गुड समिट’मध्ये रणवीरने आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाचे राजदूत म्हणूनही प्रतिनिधित्व केले आहेे. तसेच त्याने इतर अनेक तंत्रज्ञान संस्थांसाठीही राजदूत म्हणून काम केले आहे. जुलै 2025 मध्ये, रणवीरला भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने, ‘एआय’ आणि डिजिटल तंत्रज्ञानावर व्याख्यानासाठीही आमंत्रित केले होते. ‘एआय फॉर गुड ग्लोबल समिट’मध्येही तो सर्वात तरुण मुख्य वक्ता ठरला होता.
 
सप्टेंबर 2024 मध्ये वयाच्या अवघ्या सहाव्यावर्षी, रणवीर संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या सत्रातही उपस्थित राहिला होता. असे करणारा तो जगातील सर्वात तरुण तंत्रज्ञ ठरला होता. (AI Summit)
 
पाचव्या वर्षीच रणवीरला ‘अ‍ॅपल’चे आमंत्रण!
 
रणवीर सचदेव याला तंत्रज्ञान क्षेत्रात लहानपणापासूनच गती असून, त्याचे ‘अ‍ॅपल’ कंपनीशीही अनोखे नाते आहे. सन 2023 मध्ये रणवीर फक्त पाच वर्षांचा असतानाच, जगातील सर्वात तरुण प्रोग्रामर ठरला होता. त्यावेळी ‘अ‍ॅपल’चे सीईओ टिम कुक यांनी 2023 मध्ये ‘अ‍ॅपल वर्ल्डवाईड डेव्हलपर कॉन्फरन्स’मध्ये सहभागी होण्यासाठी रणवीरला ‘अ‍ॅपल’च्या कॅलिफोर्नियातील मुख्यालयात आमंत्रित केले होते. (AI Summit)