क्रिप्टो करन्सी : एक आभासी चलन

    20-Feb-2026   
Total Views |

Cryptocurrency
 
 
आभासी चलन असलेली ‘क्रिप्टो करन्सी’ भारतात बेकायदेशीर नसली, तरी तिला ‘कायदेशीर चलन’ म्हणून मान्यतादेखील नाही. तरीही जगभरात आज मोठ्या प्रमाणात ‘क्रिप्टो करन्सी’मध्ये गुंतवणूक वाढल्याचे दिसते. ‘बायनन्स’च्या २०२५च्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे, जगातील सर्वात मोठ्या ‘क्रिप्टो करन्सी’ एसचेंजने विक्रमी उलाढाल नोंदवली होती. एकूण उलाढालीचे प्रमाण हे तब्बल ३४ ट्रिलियन इतके होते, जे २०२४च्या तुलनेत २० टक्क्यांनी अधिक आहे. त्यानिमित्ताने ‘क्रिप्टो करन्सी’मधील गुंतवणूक आणि जोखीम याविषयी...
 
‘क्रिप्टो करन्सी’ म्हणजे काय?

‘क्रिप्टो करन्सी’ हे एक आभासी चलन (डिजिटल करन्सी) असून, हे ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानावर आधारित असते. या चलनावर मध्यवर्ती बँक (म्हणजे भारतात रिझर्व्ह बँक) तसेच सरकारचे नियंत्रण नसते. ‘ब्लॉकचेन’ हे असे तंत्रज्ञान आहे, की ज्यामध्ये, व्यवहारांची माहिती ब्लॉसमध्ये साठवली जाते व हे ब्लॉक एकमेकांना साखळीप्रमाणे जोडले जातात. यामुळे एक वितरित व अपरिवर्तनीय स्वरूपाचे लेजर होते व ते नेटवर्कमधील अनेक संगणकांशी जोडलेले असते. थोडयात, हे एक सार्वजनिक डिजिटल रेकॉर्ड असून, यात व्यवहार सुरक्षितपणे नोंदविले जातात व प्रत्येक व्यवहाराला ‘एन्क्रिप्शन’द्वारे सुरक्षित केले जाते.
 
‘क्रिप्टो करन्सी’ खरेदी करण्यासाठी खरेदीदराला ‘क्रिप्टो एस्चेंज’वर (उदाहरणार्थ कॉईन डीसीएस, वझीर एस, झेबपे, कॉईन बेस) खाते उघडून ऑनलाईन खरेदी करता येते. यासाठी आधी ‘केवायसी’ पूर्तता करावी लागते. अशी खरेदी केलेली ‘क्रिप्टो करन्सी’ सुरक्षिततेसाठी वॉलेटमध्ये ठेवावी लागते.
 
लोकप्रिय ‘क्रिप्टो करन्सी’

‘बिटकॉईन’, ‘इथेरियम’, ‘रिपल’, ‘लाइटकॉईन’, ‘कार्डानो’ व ‘सोलाना’ या काही लोकप्रिय ‘क्रिप्टो करन्सी.’ पण, अशा या ‘क्रिप्टो करन्सी’ अत्यंत अस्थिर असतात. त्यामुळे किमती जलद वाढतात किंवा घसरतात. गुंतवणूक करण्यापूर्वी आपली जोखीम घेण्याची क्षमता लक्षात घेऊन त्यानुसारच गुंतवणूक करावी. भारतात ‘क्रिप्टो करन्सी’ बेकायदेशीर नाही; मात्र तिला ‘कायदेशीर चलन’ म्हणून मान्यता नाही. यावरील नफ्यावर ३० टक्के कर भरावा लागतो. या करन्सीत व्यवहार करणार्‍यांनी वरील बाबी विचारात घ्याव्यात.
 
२०२६ मध्ये अधिकाधिक गुंतवणूकदार ‘क्रिप्टो करन्सी’कडे वळत आहे आणि त्यांची मानसिकता पारंपरिक फायनान्सच्या बाबतीत असते, तशीच आहे. अस्थिरता हे ‘क्रिप्टो’चे एक अंगभूत लक्षण आहे. जे आपल्या गुंतवणुकीचा विचारपूर्वक आढावा घेतात आणि घाईघाईत विक्री करत नाहीत, तेच यशस्वी होतात. जसजसा ‘क्रिप्टो करन्सी’ बाजार परिपक्व होत आहे आणि छोट्या गुंतवणूकदारांचा सहभाग व्यापक होत आहे, तसतसे गुंतवणूक धोरण बदलत आहे. मार्केटमध्ये शिस्तबद्ध सहभाग हवा, अविवेक नको. गेल्या शतकात डिजिटल अ‍ॅसेटमध्ये झालेल्या वेगवान वाढीमुळे अनेक नवे गुंतवणूकदार आकर्षित झाले आहेत.
 
दुर्दैवाने त्यांपैकी काही लोकांचा असा समज आहे की, ‘क्रिप्टो’ इतर गुंतवणुकींच्या तुलनेत फार चांगला परतावा देते. पण, ते खरे नाही. सुजाण दृष्टिकोन हा हवा. सुरुवात कमी रकमेने करा; मार्केटमध्ये कसे बदल होतात, हे जाणून घ्या आणि नंतर हळूहळू गुंतवणूक वाढवा. सुरुवातीला एकदम मोठी रक्कम गुंतवू नका. जास्त जोखीम टाळणे समजू नका, जोखीम व्यवस्थापन समजा. भाव वाढलेले असताना मोठी रक्कम गुंतवण्याऐवजी आता बरेच लोक छोट्या रकमेत सुरुवात करणे पसंत करतात. सावध धोरणामुळे गुंतवणूकदार अस्थिरता पचवू शकतात. आपल्या धोरणांत सुधारणा करू शकतात. परिणामी, मोठी रक्कम गुंतविण्यापूर्वी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो. अनेक ‘क्रिप्टो एस्चेंज’ ‘एसआयपी’ देतात. या संयम व सातत्यामुळे दीर्घकालीन संपत्ती निर्माण होऊ शकते. यात विविध पोर्टफोलिओ म्हणजे विशिष्ट उद्देशाने केलेले वाटप.
 
क्रिप्टो’मध्ये मुख्य गुंतवणुकीसाठी ‘बिटकॉईन’ आणि ‘इथेरियम’सारखी ब्लूचिप टोकन, स्पष्ट वापर उद्दिष्टांसाठी मिड-कॅप टोकन आणि धोरणात्मक लवचिकतेसाठी स्टेबल कॉईन्समधील तरल गुंतवणूक यांचा समावेश होऊ शकतो. गुंतवणुकीतील विविधतेमुळे जोखीम कमी होते; कारण एका गुंतवणुकीतील खराब कामगिरी दुसर्‍या गुंतवणुकीतील स्थिरता किंवा नफ्याने भरून निघू शकते. पारंपरिक फायनान्समधील हे मूलतत्त्व ‘क्रिप्टो’साठीदेखील तितकेच खरे आहे. गुंतवणूकदारांनी हे समजून घ्यायला पाहिजे की, प्रत्येक वाटपाचे पोर्टपोलिओमध्ये काय योगदान आहे. ते स्थिरता देत आहे, दीर्घकालीन विकासक्षमता देत आहे, की बाजाराच्या चढ-उतारांदरम्यान पर्याय देत आहे.
 
‘क्रिप्टो’ आणि पारंपरिक मार्केट या दोन्हींमध्ये गुंतवणूकदारांकडून एक मोठी चूक होते; ती म्हणजे ‘आपण मागे पडू’ या भीतीने ते बरेचदा चुकीचे निर्णय घेतात. २०२६ मध्ये अधिकाधिक गुंतवणूकदार हे कळपाच्या मानसिकतेचे आचरण टाळताना दिसत आहेत आणि आपल्या व्यापक आर्थिक उद्दिष्टांनुसार ‘क्रिप्टो’त गुंतवणूक करीत आहेत. दीर्घकालीन वृद्धीसाठी गुंतवणूक करायची असो, महागाईपासून संरक्षण मिळवायचे असो किंवा नियंत्रित प्रमाणात विकेंद्रित धोरणाचा प्रयोग करायचा असो, उद्दिष्ट स्पष्ट हवे. गुंतवणूकदाराची त्याची स्वतःची जोखीम जोखण्याची क्षमता त्याने समजून घेणे इथून आर्थिक शिस्तीची सुरुवात असते.
 
गुंतवणूकदारांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की, ‘क्रिप्टो’मधील त्यांची गुंतवणूक ही त्यांच्या एकूण आर्थिक परिस्थितीच्या तुलनेत सुसह्य असेल. जे आपल्या गुंतवणुकीचा विचारपूर्वक आढावा घेतात आणि घाईघाईत विक्री करत नाहीत, त्यांनाच पुढे दीर्घकालीन मूल्य मिळू शकते. गुंतवणुकीत टिकून राहणे याचा अर्थ जोखमींकडे दुर्लक्ष करणे, असे नव्हे. पारंपरिक फायनान्समध्ये बाजारात बदल होत असताना जोखीम प्रोफाईल राखण्यासाठी पुनर्संतुलन मदत करते. हेच तत्त्व ‘क्रिप्टो’लादेखील लागू होते. प्रत्येक वेळी किमतींतील चढ-उतार पाहून गडबडून जाऊ नका. जे गुंतवणूकदार नेटवर्क, नियामक घडामोडी आणि इकोसिस्टम्सच्या वृद्धीविषयी समजून घेतात, तेच अधिक माहितीपूर्ण निर्णय घेतात. ‘क्रिप्टो’चे क्षेत्र सतत विकसित होत आहे. ‘क्रिप्टो’ गुंतवणुकीत जोखीम आहे, हे लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी, गुंतवणुकीबाबतचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर व गुंतवणूक सल्लागारच्या मदतीने घ्यावेत, हे बरे!


(वैधानिक इशारा : कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्यावा.)

शशांक गुळगुळे

लेखक बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. २०११ साली त्यांनी सेवानिवृत्ती पत्करली. एम.ए इन इकोनॉमिक्स, डिप्लोमा इन कॉम्प्युटराईज्ड बँकिंग ऍप्लीकेशन असे आर्थिक क्षेत्राशी संलग्न शिक्षण. ते अर्थ-उद्योग विषयातील अभ्यासक आहेत.