आम्हा हिंदूंचे ‘छांदोग्य’ उपनिषद म्हणते, ‘एकोहम् बहुस्याम्’ म्हणजे सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्म एकटेच होते. आपण बहुविध व्हावे, असे त्याला वाटले आणि ते बहुविध रूपे घेऊन नटले. ख्रिश्चनांच्या ‘बायबल’मध्ये ‘जेनेसिस’ हे प्रकरण म्हणते, एकच भाषा बोलणाऱ्या लोकांनी बॅबेल येथे एक उंच मनोरा बांधून स्वर्गावर स्वारी करण्याचे ठरवले. तेव्हा देवांनी अनेक भाषा उत्पन्न करून त्या लोकांच्या मनात गोंधळ निर्माण केला. त्यामुळे लोक विखुरले आणि बॅबेलचा मनोरा अपूर्णच राहिला. काय आहे ही सगळी भानगड? जाणून घेऊया...
जशी मुसलमानांची धार्मिक शिक्षण देणारी शाळा म्हणजे ‘मदरसा’, तशी ख्रिश्चनांची ‘सेमिनरी’. तर, एका सेमिनरीत एक ज्येष्ठ पाद्री शिकाऊ पाद्य्रांना धैर्य म्हणजे काय, याबद्दल पाठ देत होता. “समजा, तुम्ही सगळे एका सुटीच्या दिवशी नदीकाठी सहलीला गेलात. दिवसभर खेळून, पोहून, नौकानयन आदी मौजमजा करून तुम्ही सेमिनरीत परतला आहात. खूप दमल्यामुळे रात्रीच्या प्रार्थनेला दांडी मारून तुम्ही झोपून गेलात, तर ते स्वाभाविकच म्हणावे लागेल. पण, खूप थकलेला असूनही जो आग्रहाने प्रार्थना करून मगच झोपायला जाईल, ते त्याचे कृत्य खऱ्या धैर्याचे लक्षण होय,” ज्येष्ठ पाद्री म्हणाला. त्यावर एक चंट शिकाऊ पाद्री म्हणाला, “फादर, माझे मत थोडेसे वेगळे आहे. समजा, खूप थकलेले असूनही सगळे जण केवळ वरिष्ठ पाद्य्रांच्या भीतीने, कसेबसे प्रार्थना उरकतायत आणि एखादा पाद्री सगळ्यांना फाट्यावर मारून बिनधास्तपणे झोपलाय, तर ते खरे धैर्य, असे मला वाटते.”
पाद्री, चर्च, पोप इत्यादींची मस्त टिंगल करणारे वरीलप्रमाणे किस्से पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांमध्ये नेहमीच प्रसिद्ध होत असतात. इस्लाम आणि ख्रिश्चानिटीमध्ये हा महत्त्वाचा फरक आहे. इस्लामची कथित टिंगल झाल्याच्या आरोपावरून फ्रान्समध्ये पत्रकारांना ठार मारण्यात आले आणि दंगली करण्यात आल्या. पाद्री आणि चर्चची उघड-उघड टिंगल केली जाते; पण ती करणाऱ्यांविरुद्ध फतवे वगैरे निघत नाहीत.
परंतु, पाद्य्रांचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांचे कामातले सातत्य. त्यांनी टिंगल केली जाते; विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे चर्चमध्ये जाणाऱ्या लोकांची संख्या सतत घटतच चाललेली आहे, कोणत्याही विषयात पाद्री किंवा पोप काय म्हणतात, याला कुणीही फारशी किंमत देत नाही. गेल्या काही वर्षांपासून कॅथलिक पाद्य्रांच्या अनैसर्गिक लैंगिक भानगडी मोठ्या प्रमाणावर उघडकीस येत आहेत. पण, असे सगळे असूनही, आम्हाला एक ना एक दिवस संपूर्ण जग ख्रिश्चन करून सोडायचे आहे, ही पाद्य्रांची जिद्द काही कमी होत नाही. विविध प्रकारच्या सेवाकार्यांच्या माध्यमातून कधी गुपचूप, तरी कधी उघडपणे त्यांचे बाटवाबाटवीचे उद्योग अथकपणे चालू आहेत. ‘बाटवाबाटवी’ हा शब्द तीव्र वाटत असेल, तर
धर्मांतरण म्हणा. शेवटी हिशोब तोच.
या उद्योगातला एक प्रमुख भाग म्हणजे ‘बायबल’ हे जगातल्या अधिकाधिक भाषांमधून उपलब्ध करून देणे. ख्रिश्चन पाद्री, मग ते कोणत्याही पंथाचे असोत; ते ज्या-ज्या देशात गेले, तिथली भाषा त्यांनी आत्मसात केली आणि सर्वप्रथम ‘बायबल’चे त्या भाषेत भाषांतर केले. आज जगभरातल्या 750 भाषांमध्ये ‘बायबल’ उपलब्ध आहे. पाद्य्रांच्या या चिकाटीबद्दल, सातत्याने कार्यरत राहण्याच्या गुणाबद्दल त्यांचे कौतुक करून त्यांचा तो गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण, पाद्री एवढ्यावर समाधानी नाहीत. त्यांची अशी जिद्द आहे की, आज जगभरात किमान सात हजार बोलीभाषा आहेत. या प्रत्येक बोलीभाषेत ‘बायबल’ आला पाहिजे. म्हणजेच, सात हजार बोली बोलणाऱ्या सात हजार लोकसमूहांपर्यंत आमचा धर्मग्रंथ पोहोचला पाहिजे आणि आम्ही तो पोहोचवणार. खरोखरच कौतुकास्पद जिद्द आहे. 1999 साली ‘वायक्लिफ ऑर्गनायझेशन’ नामक संघटनेने यासाठी अजून किती काळ लागेल, याचा एक अंदाज घेणारे सर्वेक्षण केले होते. तेव्हा त्यांना असे आढळले की, या कार्याला अजून साधारण 150 वर्षे लागतील.
पण, आता कृत्रिम बुद्धिमत्ता उर्फ ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ उर्फ ‘एआय’मुळे हे काम सन 2033 पर्यंत पूर्ण व्हायला हरकत नाही, असे त्यांना वाटत आहे. आता इथे आपण ‘बायबल’ या ग्रंथाचा थोडा तपशीलवार परिचय करून घेऊया. ‘बायबल’चे दोन मुख्य भाग आहेत- पहिला, ‘ओल्ड टेस्टामेंट’ उर्फ ‘जुना करार’ आणि दुसरा, ‘न्यू टेस्टामेंट’ उर्फ ‘नवा करार.’ ‘ओल्ड टेस्टामेंट’ हे एक सलग असे पुस्तक नसून त्याच्यात एकंदर 39 छोटी पुस्तके समाविष्ट आहेत. त्यांची मूळ भाषा ‘हिब्रू’ आणि ‘आर्माईक’ आहे. या पुस्तकांमध्ये ऐतिहासिक कथा आहेत, काव्ये आहेत, कायदेकानून आहेत आणि भविष्यकाळात काय घडेल, याची भाकितेही आहेत. ‘ओल्ड टेस्टामेंट’ची रचना येशू ख्रिस्तापूव झाली, अशी पारंपरिक समजूत आहे. ‘न्यू टेस्टामेंट’मध्ये एकंदर 27 छोटी पुस्तके समाविष्ट आहेत. त्यांची भाषा कोनी ग्रीक आहे. त्यांत येशू ख्रिस्ताचे चरित्र, संबंधित ऐतिहासिक कथा, येशूच्या प्रमुख शिष्यांची चरित्रे आणि त्यांनी पत्रव्यवहाराद्वारे अनुयायांना केलेले मार्गदर्शन आणि अखेरीस भविष्यकालीन भाकिते असा सगळा भाग आहे. ‘न्यू टेस्टामेंट’ची रचना इसवी सन 405च्या सुमारास पूर्ण झाली असावी, असा अंदाज आहे.
वेद, उपनिषदे, पुराणे, रामायण, महाभारत यांच्याबाबत पाश्चिमात्त्यांचा प्रमुख आक्षेप हा असतो की, या सर्व रचना आणि त्या रचनांमधील घटना केव्हा घडल्या, याचा कोणताही उल्लेख कोणीही, कुठेही केलेला नाही. त्यामुळे हे सगळे ग्रंथ म्हणजे गुराख्यांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत. गुरांचे कळप रानात चरायला सोडल्यावर गुराखी पोरे खेळ खेळत किंवा टाईमपास करण्यासाठी काल्पनिक गोष्टी रचून एकमेकांना सांगत. त्यातून तुमचे हे ग्रंथ निर्माण झालेत. त्यांत ज्ञान-बिन काहीही नाही. आता गोऱ्या चामडीचे पाश्चिमात्य असे म्हणतात, म्हणून आमच्याकडचे गुलामी मानसिकता असणारे कथित सुशिक्षित आणि लबाड समाजवादी नि साम्यवादी पण त्यांचीच ‘री’ ओढतात. तर, त्यांना सांगायला हवे की, ‘बायबल’च्या रचनेचा काळही निश्चित नाही आणि त्यातल्या घटनांच्या काळाचाही कसलाही उल्लेख कोणीही, कुठेही केलेला नाही. त्यांना हेही ठणकावून सांगायला हवे की, आम्ही मानव आणि आमचा परमेश्वर यांच्यात कसलाही भेद नाही. आमचे उपनिषद स्पष्ट शब्दांत सांगते की, आधी ब्रह्म म्हणजेच परमेश्वर एकटाच होता. मग आपण बहुविध रूपे धारण करावीत, असे त्याला वाटले. तो बहुविध झाला. म्हणजे आम्ही मानवच काय, ही संपूर्ण चर-अचर सृष्टी म्हणजे त्या एकाच परमेश्वराची रूपे आहेत आणि तुम्ही एक होतात; चांगले बॅलेलचा मनोरा बांधून स्वर्गारोहण करण्याच्या प्रयत्नात होतात; तर तुमच्या देवाने तुमच्यात अनेक भाषा निर्माण करून विसंवाद घडवून आणला नि तुम्हाला स्वर्गात येण्यापासून रोखले. आपल्याच लेकरांवर अन्याय करणारा असला कसला हा तुमचा देव?
असो. आपण हिंदू लोक असले कोणतेही प्रतिवाद करायला जाणार नाही आहोत. आम्ही ढीगभर वाहिन्यांवर ढीगभर प्रेमकथा चालूच आहेत, त्यातल्या दुसऱ्यांच्या बायका बघत घरात बसणार. पाद्य्रांची ‘वायक्लिफ ऑर्गनायझेशन’ अधिकाधिक बोलीभाषा ‘एआय’मध्ये टाकून ‘एआय’मार्फत जगातल्या सर्वच्या सर्व सात हजार बोलीभाषांमध्ये संपूर्ण ‘बायबल’ कसे आणता येईल, याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत आहे. सन 2033 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
भाषांतर करताना नेहमीच ज्या अडचणी येतात, त्या त्यांनाही येत आहेत. एखाद्या अवघड कामाला इंग्रजीमध्ये ‘हर्क्युलियन टास्क’ असा शब्द आहे. या शब्दाला इतिहास आहे. ग्रीक पौराणिक नायक हर्क्युलिस याने संपूर्ण पृथ्वी आपल्या पाठीवर उचलली होती, ही कथा ज्यांना माहीत आहे, त्यांना ‘हर्क्युलियन टास्क’ या शब्दातून लेखकाला काय म्हणायचे आहे, हे लक्षात येईल. मराठीत भाषांतर करताना तिथे, अमक्याने अमूक कार्याचा गोवर्धन उचलला किंवा शिवधनुष्य पेलले, असा भावानुवाद करावा लागेल, अन्यथा ते भाषांतर कृत्रिम होईल.
आता याबाबतीत ‘वायक्लिफ’ संघटनेच्या भाषांतरकारांना कसे गमतीदार अनुभव येतायत पाहा. ‘ॲक्सेप्ट जीजस इनटु युवर हार्ट’ अशा वाक्याचा मराठी अनुवाद ‘येशूला तुमच्या हृदयात स्थान द्या’ असा होईल आणि त्याचा अर्थ वाचकाला कळेल. कारण, मराठी किंवा एकंदर हिंदू माणसाच्या दृष्टीने देवाचे वसतिस्थान हे हृदयात असते. पण, ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला पॅसिफिक महासागरात पापुआ न्यूगिनी हा देश आहे. एकेकाळी तिथले लोक नरभक्षक होते. आता ‘वायक्लिफ’ संघटनेचे लोक त्यांच्यापर्यंत पोहोचलेत. त्यांच्यामध्ये दोन मुख्य जमाती आहेत. एकीचे नाव ‘रावा’ आणि एकीचे नाव ‘आवा’. तर, रावा जमात हृदय हा मुख्य अवयव न मानता पोट हा मुख्य अवयव मानते. त्यांच्या पारंपरिक श्रद्धेनुसार देव हृदयात नव्हे, तर पोटात राहतो. आवा जमात आणखी खोलात जाते. त्यांच्या पारंपरिक श्रद्धेनुसार देव हा हृदयात नव्हे, तर पोटातल्या यकृत या अवयवात (मराठीत लीव्हर) राहतो. आता ‘बायबला’तल्या त्या वाक्याचे भाषांतर करताना ‘एआय’ला ही पण माहिती भरवावी लागेल. म्हणजे मग ‘येशूला तुमच्या पोटात किंवा यकृतात स्थान द्या’, असे योग्य भाषांतर ‘आवा’ आणि ‘रावा’ यांच्या बोलींमध्ये होईल.
आपल्याला हे सगळेच कदाचित निरुपयोगी आणि हास्यास्पद वाटू शकेल. परंतु, ‘बायबल’च्या भाषांतराचे काम करणाऱ्या अनेक संस्था या कामासाठी एकत्र आल्या आहेत. ‘इल्युमिनेशन’ म्हणजे ‘प्रकाश’ या नावाची एक मध्यवत संस्था त्यांनी स्थापन केली असून, आतापर्यंत त्यांनी 50 कोटी डॉलर्सच्या देणग्या मिळवल्या आहेत. ‘लार्ज लँग्वेज मॉडेल - एल. एल. एम.’ या संगणकीय कार्यक्रमाअंतर्गत आशिया - आफ्रिकेतील 200 बोलीभाषांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले असून, आपण सन 2033 पर्यंत आपले लक्ष्य नक्कीच गाठू, असा त्यांना विश्वास आहे. भोळे-भाबडेपणा हा जगात सर्वत्र आहे. त्यानुसार, अनेक भाबड्या येशूभक्तांची अशी खात्री आहे की, जगातल्या सर्व भाषांमध्ये ‘बायबल’ पोहोचले की, येशू पुन्हा पृथ्वीवर अवतरणार आहे.
तेव्हा, वाट पाहात राहा सन 2033ची!
- मल्हार कृष्ण गोखले