नुकतीच मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक पार पडली. बर्याच वर्षांनंतर मुंबई महापालिकेत भाजपचा भगवा फडकला. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांची पालिकेतील २५ वर्षांची सत्ता मोडकळीस आली. यामुळेच कदाचित, उबाठा गटाच्या नगरसेवकांना विरोधी बाकावर काटे टोचत असल्याचे चित्र महापौर निवडीच्या कार्यक्रमादरम्यान दिसले. मुंबई महापालिकेच्या सभागृहात भाजपच्या महापौर निवडीचा ऐतिहासिक सोहळा सुरू झाल्यावर सुरुवातीलाच उबाठा गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पीठासीन अधिकारी भूषण गगराणी यांच्या नावावर आक्षेप घेतला. खरेतर, सभागृहात नियमाप्रमाणे कामकाज सुरू असताना उबाठा गटाच्या नगरसेवकांनी घातलेला गोंधळ आश्चर्यकारक होता.पहिल्याच दिवशी नवनिर्वाचित उपमहापौर संजय घाडी यांच्या भाषणाची प्रत फाडून टाकण्यापर्यंत त्यांची मजल गेली. शिवाय, उबाठा गटाच्या वतीने सुरू असलेली घोषणाबाजी, आक्रमकपणा आणि गोंधळ, यामुळे सभागृहात गदारोळ झाला होता. याउपर, पेडणेकरताईंनी बाहेर येऊन माध्यमांसमोर एकनाथ शिंदे यांच्या नगरसेवकांचीच ‘बॉडी लँग्वेज’ विक्षिप्त होती, असा आरोप केला.
किशोरीताई मुंबई महापालिकेच्या माजी महापौर. मात्र, त्यांचे आणि त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांचे सभागृहातील वर्तन अशोभनीय म्हणावे लागेल. या सगळ्यात काँग्रेसचे नगरसेवकही मागे नव्हते. दुसरीकडे, महापौर निवडीच्या प्रक्रियेनंतर एक महिला पत्रकार वार्तांकन करण्यासाठी महापालिकेतील उबाठा गटाच्या कार्यालयात गेली असता, नगरसेविका विशाखा राऊत यांच्यातर्फे तिला अपमानास्पद वागणूक देण्यात आली. ती पत्रकार महिला आपल्या कर्तव्यावर असताना तिची औकात काढण्यापर्यंत त्यांची हिंमत झाली. एकूणच, सभागृहातील गदारोळ आणि विरोधी बाकावर बसणे पसंत न पडल्याने विशाखाताईंच्या वर्तनातून उबाठा गटाच्या नगरसेवकांचा संताप आणि निराशा स्पष्टपणे जाणवली. २५ वर्षांनंतर सत्ता गेल्याचा धक्का त्यांच्या चेहर्यावर स्पष्टपणे दिसत होता. कदाचित, इतया वर्षांतील मुंबई महापालिकेतील अकार्यक्षमता पाहून यंदा जनतेने आपल्याला विरोधी पक्षात बसवले, हे अजूनही त्यांच्या पचनी पडलेले नाही. त्यामुळेच सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी काहीशी उबाठा गटाच्या नगरसेवकांची अवस्था!
मी नाही त्यातली...
"तुम करे तो रासलीला, हम करो तो कॅरेटर ढिला; अशी संजय राऊत यांची वागणूक बरी नाही,” हे वाक्य आहे, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचे. याला संदर्भ आहे, तो चंद्रपूर महानगरपालिकेतील घडामोडींचा. चंद्रपूरमध्ये उबाठा गटाने घेतलेल्या भूमिकेवरून उबाठा गट आणि मनसेत जुंपली आणि संदीप देशपाडेंनी शेलक्या शब्दांत राऊतांचा समाचार घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौरपदाचा तिढा सुटत नव्हता. काँग्रेसला इथे स्पष्ट बहुमत असूनही खा. प्रतिभा धानोरकर आणि आ. विजय वडेट्टीवार यांच्यातील अंतर्गत वादामुळे त्यांना महापौर बसवता आला नाही. साहजिकच, या दोघांच्या भांडणात तिसर्याचा लाभ झाला. उबाठा गटाने भाजपला पाठिंबा दिला आणि चंद्रपूर महापालिकेवर भाजपचा भगवा फडकला. मात्र, या घडामोडींमुळे मनसेला पोटदुखी सुरू झाली.
खरेतर, उबाठा गटाच्या नगरसेवकांनी चंद्रपूरमध्ये भाजपला समर्थन देऊन त्यांचा महापौर विराजमानही झाला. परंतु, संजय राऊत यांची इकडे भलतीच पोपटपंची सुरू होती. ‘उद्धव ठाकरे यांची कोणत्याही परिस्थितीत भाजपला मदत करण्याची भूमिका नव्हती,’ हे एकच वाक्य ते सारखे रेटत राहिले. अर्थात, राऊतांच्या या वाक्यावर विश्वास ठेवला, तर मग उद्धव ठाकरे यांना त्यांचे नगरसेवक जुमानत नाहीत, असे म्हणावे का? की, राऊतांच्याच बोलण्याला किंमत नाही? संजय राऊतांच्या याच बोलघेवडेपणावर मनसेचे नेते तुटून पडले. चंद्रपूरच्या बाबतीत संजय राऊत यांना अंधारात ठेवले की, त्यांनी स्वतःहून डोळ्यावर पट्टी बांधून ठेवली, असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला. कल्याण-डोंबिवलीत मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिल्याने राऊतांचा तिळपापड झाला होता. मग, आता मनसे नेते ही संधी कशी सोडणार? त्यामुळेच, "तुमचे ते चंद्रपूर, आमचे ते डोंबिवली? वाह रे वाह!” असे म्हणत राजू पाटील यांनीही राऊतांना डिवचले. वास्तविक, आपण बोलतो काय? आणि आपल्या पाठीमागे काय घडतेय, याची कल्पना संजय राऊतांसारख्या नेत्याला नसावी म्हणजे आश्चर्यच. संपूर्ण चित्र स्पष्ट असतानाही आणखी किती दिवस ‘मी नाही त्यातली, कडी लावा आतली’ ही भूमिका घेणार? याचे उत्तर संजय राऊतांना शोधावे लागेल.