Ratnagiri news - बंधाऱ्याच्या कामामुळे सागरी कासवांचे पतरण्याचे सत्र सुरूच

    10-Feb-2026   
Total Views |

Ratnagiri news

मुंबई (अक्षय मांडवकर) – रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक किनाऱ्यांवर अनियोजित पद्धतीने सुरू असणाऱ्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामामुळे सागरी कासवे अंडी न घालताच समुद्रात परतण्याचे सत्र सुरूच आहे (Ratnagiri news). दै. मुंबई तरुण भारतने ३ फेब्रुवारी रोजी याविषयीचे वृत्त प्रकाशित केले होते (Ratnagiri news). मात्र, वन विभाग या घटनेत राजकीय हस्तक्षेपाचा घाबरुन केवळ बघ्याच्या भूमिकेत असल्याने कोकणातील कासव विणीला याचा फटका बसत आहे (Ratnagiri news). रविवार दि. ८ फेब्रवारी रोजी दापोली तालुक्यातील आडे किनाऱ्यावरील बंधाऱ्याच्या कामामुळे मादी कासव अंडी न घातलाच परतली असून रायगडमध्ये देखील बांधलेल्या बंधाऱ्याचे परिणाम कासव विणीवर दिसून येत आहेत. (Ratnagiri news)

 
 


रत्नागिरी जिल्ह्यात किनाऱ्याची धूप रोखण्यासाठी काही किनाऱ्यांवर धूप प्रतिबंधक बंधारे बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र, हे काम सध्या किनाऱ्यावर सुरू असणाऱ्या सागरी कासव विणीला गृहित न धरता सुरू केल्याने त्याचा फटका सागरी कासवांना बसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात २८ किनाऱ्यांवर सागरी कासवांची वीण होते. त्यापैकी २५ किनाऱ्यांवर हे बंधारे प्रस्तावित असून भाट्ये, नेवरे, आडे यांसारख्या कासव विणीसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या किनाऱ्यांवर बांधकामाला सुरूवात झाली आहे. काही किनाऱ्यावर हे बंधारे किनाऱ्याच्या तिरावर न बांधता किनाऱ्याच्या मध्यभागी बांधण्यात येत आहे. त्यामुळे कासवांच्या अंडी घालण्याचा जागाच बांधकामाखाली गेल्या आहेत. रविवार दि. ८ फेब्रुवारी रोजी दापोली तालुक्यातील आडे किनाऱ्यावरील बंधाऱ्याच्या बांधकामातील दगडाला धडकल्यामुळे मादी कासव अंडी न घालता समुद्रात परतली.
 
 

 

बांधऱ्याच्या कामासाठी मोठ्या संख्येने दगड हे आडे किनाऱ्यावर ठेवण्यात आले आहेत. अशा वेळी मादी कासव अंडी घालण्यासाठी समुद्रातून बाहेर आल्यावर या दगडाला धडकत असल्याने त्या घाबरुन समुद्रात परतत आहेत. रविवारी बंधाऱ्यावरच सागरी कासवाचे ट्रॅक दिसून आले. गेल्यावर्षी आडे समुद्रकिनाऱ्यावर सागरी कासवाची १३ घरटी आढळून आली होती. मात्र, बंधाऱ्याच्या कामामुळे यंदा एकही घरटे आढळून आलेले नाही. पतन विभागाने दिलेल्या माहितीनंतर महाराष्ट्र शासनाने यासाठी जिल्ह्यात २५ किनाऱ्यांच्या संरक्षणासाठी बंधाऱ्यांच्या कामाला मान्यता दिली होती व त्यासाठी निधीही मंजूर केला होता. त्याअंतर्गत या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, या कामामुळे सागरी कासवांच्या विणीसाठी महत्त्वाचे असणाऱ्या किनाऱ्यांना शथी पोहोचण्यास सुरुवात झाली आहे.

 


रायगडमधील बंधाऱ्याचे परिणाम
रायगडमध्ये कासव विणीच्या किनाऱ्यावर अशा पद्धतीचे बंधारे दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते. त्याचे देखील परिणाम आता दिसू लागले आहेत. उदा. रविवारी दि. ८ फेब्रुवारी रोजीच मारळ आणि श्रीवर्धन किनाऱ्यावरील बंधाऱ्याला धडकल्याने मादी कासव अंडी न घालताच समुद्रात परतल्या. हरिहरेश्वर मंदिरानजीकच्या मारळ किनाऱ्यावर बंधारा आणि कचरा या दोन्ही कारणांमुळे दोन मादी कासव अंडी न घालता समुद्रात परतल्या. मारळ किनाऱ्यावर एकाच बाजूला बंधारा बांधल्यामुळे किनाऱ्याच्या दुसऱ्या बाजूला समुद्रातून वाहून आलेला कचरा साचून राहतो होतो. रविवारी पहाटे या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी समुद्रामधून दोन मादी कासव समुद्रातून बाहेर आल्या. त्यामधील एक कासव बंधाऱ्याला धडकल्यामुळे आणि एका कासवाला अंडी घालताना प्लास्टिक कचरा जाणवल्यामुळे त्या अंडी न घालताच समुद्रात परतल्या.

 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.