विलासराव देशमुख यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

07 Jan 2026 19:06:16
Devendra Fadnavis
 
लातूर : ( Devendra Fadnavis ) काँग्रेस पक्षाशी आमची लढाई असली तरी विलासराव देशमुख यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. ते या महाराष्ट्रातील एक महत्वाचे नेतृत्व आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. लातूर महानगरपालिका निवडणूक प्रचारार्थ पार पडलेल्या 'विजय संकल्प सभेत' ते बोलत होते. यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यू पवार, आ. रमेश कराड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "लातूरच्या भूमीने महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात नेतृत्व दिले. शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी लातूरला एक वेगळी ओळख दिली. पक्षाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्यांचा मोलाचा वाटा आहे, त्यातील एक प्रमुख नाव विलासराव देशमुख यांचे आहे. दोन दिवसांपूर्वी इथे काही गोंधळ तयार झाला. आमचे प्रदेशाध्यक्ष (रविंद्र चव्हाण) यांना राजकीयदृष्ट्या आपल्याला नवीन रेकॉर्ड तयार करायचा आहे, असे सांगायचे होते. पण कदाचित त्यांचे हे शब्द चुकीच्या पद्धतीने गेले असतील. त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मी जाहीरपणे सांगतो की, काँग्रेस पक्षाशी आमची लढाई असली तरी विलासराव देशमुख यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. ते या महाराष्ट्रातील एक महत्वाचे नेतृत्व आहेत. या भुमीमध्ये नेतृत्व तयार करण्याचा एक गुण आहे."
 
हेही वाचा : संजय राऊत यांना वसुलीची सवय आहे - नवनाथ बन
 
"पुढच्या काळात लातूरमध्ये पुन्हा कधीही रेल्वेने पाणी आणावे लागू नये, यादृष्टीने आपल्याला काम करायचे आहे. त्यासाठी जलयुक्त शिवारपासून ते पिण्याच्या पाण्याच्या योजनेपर्यंत विविध योजनांना आपण चालना दिली. लातुरच्या प्रत्येक घरात रोज शुद्ध पिण्याचे पाणी आले पाहिजे यादृष्टीने आपण सगळे नियोजन केले. मध्यंतरी सरकार गेल्यानंतर आपण केलेले नियोजन बासनात गुंडाळण्यात आले. पण चिंतेचे कारण नाही. पुन्हा आपले सरकार आल्यावर या योजनांना आपण चालना दिली. २५९ कोटींची योजना लातूरसाठी मंजूर केली असून त्याचे २२ टक्के कामही पूर्ण झाले आहे. पुढच्या काळात लातूरमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असणार नाही. मला कोणावर टीका करायची नाही. पण काही लोकांनी निवडणुकीत निवडून आल्यानंतर १०० दिवसांत पाणी देईन, नाहीतर राजीनामा देईन, अशी वचने दिली होती. पण त्यांनी पाणीही दिले नाही आणि राजीनामाही दिला नाही," असा टोला त्यांनी लगावला.
 
मोदीजींच्या योजनांमुळे शहरे बदलू लागली
 
"२०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या शहर विकासाच्या योजनांमुळे शहरे बदलत आहेत. जवळजवळ ७० वर्षांत आपल्या देशात राज्यकर्त्यांनी शहराच्या विकासासाठी कुठलेही नियोजन केले नाही. त्यामुळे शहरे बकाल झाली. पण पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांनी शहरांच्या विकासाच्या योजना तयार केल्या. महाराष्ट्रातील शहरांना ५० हजार कोटी रुपये दिल्याने इथली शहरे बदलू लागलीत," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0