मुंबई : (Hidayatullah Patel) महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे नेते हिदायतुल्लाह पटेल (वय ६६) यांची मंगळवारी दि. ६ जानेवारी रोजी नमाज अदा करून मशिदीतून बाहेर पडत असताना निर्घृण हत्या करण्यात आली. या हल्ल्यात आरोपीने त्यांच्या मानेवर आणि छातीवर चाकूने अनेक वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र बुधवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. (Hidayatullah Patel)
ही घटना अकोट तालुक्यातील कोटा गावातील जामा मशिदीबाहेर घडली. माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, हिदायतुल्लाह पटेल नमाज अदा करून सुमारे दुपारी १.३० वाजता मशिदीतून बाहेर पडत असतानाच हल्लेखोराने त्यांच्यावर चाकूहल्ला केला. परिसरातील नागरिकांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात नेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फॉरेन्सिक तपासणीसाठी पुरावे गोळा केले. जलद तपास करत पोलिसांनी २२ वर्षीय उबेद खान उर्फ कालू खान याला आरोपी म्हणून ताब्यात असून, त्याला ६ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता अटक करण्यात आली. या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी तब्बल सहा पथके तैनात केली होती. (Hidayatullah Patel)
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हिदायतुल्लाह पटेल आणि आरोपीच्या कुटुंबामध्ये जुनी रंजिश होती, त्यातूनच हा हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हत्येनंतर कोटा गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Hidayatullah Patel)