पुणे : (Suresh Kalmadi) माजी केंद्रीय मंत्री, पुण्याचे माजी खासदार आणि माजी रेल्वे राज्यमंत्री सुरेश कलमाडी यांचे मंगळवारी दि. ६ जानेवारी रोजी पहाटे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. त्यांचे पार्थिव दुपारी २ वाजेपर्यंत एरंडवणे येथील ‘कलमाडी हाऊस’ या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, दुपारी ३.३० वाजता नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमांवरून मिळत आहे. (Suresh Kalmadi)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अध्यक्ष शरद पवार यांनी कलमाडी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. अजित पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, “पुणे शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे सुरेश कलमाडी यांच्या निधनानं पुणे शहराच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून अनुभवी ज्येष्ठ नेतृत्व हरपलं आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” (Suresh Kalmadi)
शरद पवार यांनीही एक्स वरून श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले की, “काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्या निधनाने देशाच्या राजकारणातील एक अनुभवी, संघर्षातून घडलेला आणि दीर्घ सार्वजनिक जीवनाचा वारसा असलेला नेता आपण गमावला आहे.” (Suresh Kalmadi)
२०११ मधील कॉमनवेल्थ गेम्स (CWG) घोटाळ्यानंतर काँग्रेस पक्षातून निलंबन झाल्यानंतर कलमाडी राजकारणात सक्रिय नव्हते. मात्र पुण्याच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान हे अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. (Suresh Kalmadi)