मुंबई : ( Narendra Modi ) भगवान बुद्धांशी संबंधित पवित्र पिपरहवा अवशेष भारतात परत आल्याने देशाची अमूल्य सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा पुन्हा मायभूमीत आल्याचा गौरवाचा क्षण असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दिल्लीतील राय पिथौरा सांस्कृतिक परिसरात आयोजित पिपरहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनीचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, गुलामीच्या काळात भारतातून नेले गेलेले हे अवशेष १२५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा भारतात आले असून, त्यांना आपल्या मध्ये पाहणे हे देशासाठी भाग्याचे आहे. अवशेष भारताबाहेर जाणे आणि पुन्हा परत येणे हा इतिहासातून मिळालेला मोठा धडा असल्याचे त्यांनी नमूद केले. ज्यांनी हे अवशेष नेले, त्यांच्यासाठी ते केवळ प्राचीन वस्तू होत्या आणि त्यांची आंतरराष्ट्रीय बाजारात निलामी करण्याचाही प्रयत्न झाला होता. मात्र भारताने हे होऊ दिले नाही. या प्रक्रियेत सहकार्य केल्याबद्दल गोदरेज समूहाचे त्यांनी आभार मानले.
सन १८९८ मध्ये उत्तर प्रदेशातील कपिलवस्तु क्षेत्रातील पिपरहवा येथे ब्रिटिश काळात झालेल्या उत्खननात भगवान बुद्धांचे अवशेष सापडले होते. त्या काळात हे अवशेष भारताबाहेर पाठवण्यात आले होते, जे आता पुन्हा भारतात आणण्यात आले आहेत. भगवान बुद्धांचे ज्ञान संपूर्ण मानवतेचे असल्याचे सांगत पंतप्रधानांनी विविध देशांतील अनुभव मांडले. थायलंडमध्ये चाळीस लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले, मंगोलियात लोकांनी तासन्तास प्रतीक्षा केली, तर रशियातही लाखो लोकांनी श्रद्धेने दर्शन घेतल्याचे त्यांनी सांगितले. बुद्ध सर्वांचे आहेत आणि ते मानवतेला जोडणारे आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. भारत हा केवळ राजनैतिक संबंधांपुरता मर्यादित नसून आस्था आणि अध्यात्माच्या माध्यमातूनही जगाशी नाते जोडतो, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी अधोरेखित केले.
हेही वाचा : जगातील सर्वात मोठे शिवलिंग बिहारमध्ये दाखल
देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी ब्रिटिश काळात १२५ वर्षांपूर्वी भारतातून गेलेले भगवान गौतम बुद्धांचे पवित्र अवशेष पुन्हा देशात आणून भारताचा आध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा जपला आहे. एकता, समानता, बंधुता आणि शांततेचा संदेश देणाऱ्या भगवान बुद्धांचे अवशेष भारतात परत येणे ही अभिमानास्पद बाब आहे. याबद्दल सर्व भारतीयांच्या वतीने मनःपूर्वक आभार.
— अशोक कांबळे, कार्याध्यक्ष, समता परिषद, मुंबई