मुंबई : ( World’s Largest Shivling Reaches Bihar )पूर्व चंपारण्यातल्या कैथवलिया येथील विराट रामायण मंदिरात स्थापना होणारे जगातील सर्वात मोठे शिवलिंग तामिळनाडू येथून, ४२ दिवसांचा प्रवास पूर्ण करत बिहार येथे आणण्यात आले आहे. हे शिवलिंग तब्बल ३३ फूट लांब असून २१० टन वजनाचे आहे. येत्या जानेवारी रोजी याची विराट रामायण मंदिरात स्थापना करण्यात येईल.
शिवलिंगाच्या आगमनाबद्दल भाविकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक म्हणून संपूर्ण वाटेवर शिवलिंगाची पूजा करून फुले टाकण्यात येत होती. उत्तर प्रदेशमार्गे बिहारमधील गोपालगंज जिल्ह्याच्या सीमेवर दाखल होताच बालथरी चौकीवर भाविकांनी हार आणि फुले वाहून त्याचे स्वागत केले. यावेळी या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.
१० वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर तयार
दगडी कोरीवकाम आणि प्राचीन स्थापत्यकलेसाठी प्रसिद्ध असलेल्या तामिळनाडूतील ऐतिहासिक महाबलीपुरम शहरात हे भव्य शिवलिंग तयार करण्यात आले. सुमारे १० वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर हे शिवलिंग पूर्ण झाले. काळ्या ग्रॅनाइटपासून बनवलेल्या या शिवलिंगात १०८ शिवलिंगे आहेत. ते बिहारला नेण्यासाठी खास डिझाइन केलेले ९६ चाकांचे जड ट्रेलर वापरण्यात आले.
प्रवासाची कहाणी
महाबलीपुरमहून शिवलिंग आणणारे कारागीर अरुण कुमार यांनी सांगितले की, शिवलिंग २३ नोव्हेंबर रोजी तामिळनाडूहून निघाले आणि ४२ दिवसांच्या प्रवासानंतर बिहारमध्ये पोहोचले. ते विराट रामायण मंदिरात स्थापित केले जाईल. हे शिवलिंग केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र बनणार नाही तर भारताच्या प्राचीन वास्तुकलेचे एक अद्भुत उदाहरण असेल.
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.