मुंबई : (Sunetra Pawar) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेतृत्व बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील देवगिरी बंगल्यावर एनसीपीच्या वरिष्ठ नेत्यांची सुनेत्रा पवार यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे. या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद, सुनेत्रा पवार यांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा आणि उपमुख्यमंत्री शपथविधी यावर सविस्तर चर्चा होत असल्याची माहिती मिळत आहे. (Sunetra Pawar)
या बैठकीला प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, नरेश अरोरा, हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ हे प्रमुख नेते उपस्थित आहेत. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे सकाळीच देवगिरी बंगल्यावर दाखल झाले होते. (Sunetra Pawar)
हेही वाचा : Navnath Ban: ‘शोक असतो, पण घटनात्मक जबाबदाऱ्या थांबत नाहीत’: नवनाथ बन यांचा राऊतांना टोला
राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णय आजच?
एनसीपीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत आजच अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षातील बहुतांश वरिष्ठ नेत्यांचा कल सुनेत्रा पवार यांच्या नावाकडे असून, पवार कुटुंबालाच पुन्हा पक्ष नेतृत्वाची जबाबदारी देण्याबाबत सहमती असल्याची माहिती माध्यमांवरून मिळत आहे.
राज्यसभा राजीनाम्याची तयारी...
सुनेत्रा पवार या सध्या राज्यसभा खासदार आहेत. उपमुख्यमंत्रीपदासाठी घटनात्मक अडथळा दूर करण्यासाठी त्या आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. या विषयावरही देवगिरीवरील बैठकीत चर्चा सुरू असून काही वेळातच त्या खासदारकीचा राजीनाम देणार असल्याचे समजत आहे. (Sunetra Pawar)
दुपारी २ वाजता विधान भवनात एनसीपीच्या विधायक दलाची बैठक होणार असून, या बैठकीत गटनेत्याची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता राजभवनात सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे. अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीमध्ये एनसीपीत नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू होत असल्याचं चित्र असून, देवगिरी बंगल्यावर सुरू असलेली ही बैठक पक्षाच्या भविष्यासाठी निर्णायक ठरण्याची चिन्हं आहेत. (Sunetra Pawar)