गोवा : (Pramod Sawant) महाराष्ट्राच्या शेजारीच असणाऱ्या गोवा राज्यात उत्तर आणि दक्षिण असे दोन जिल्हे होते. पण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आता राज्यात तिसऱ्या जिल्ह्याची निर्मिती होणार असल्याची घोषणा केली आहे. जिल्हा निर्मितीच्या घोषणेसोबतच नवीन जिल्ह्याचे नावही त्यांनी जाहीर केले आहे. गोव्यातील पुरातन भौगोलिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या कुशावती नदीच्या नावावरून नवीन जिल्ह्याला कुशावती नाव देण्यात येणार आहे. (Pramod Sawant)
हेही वाचा : Nitesh Rane : चिपी विमानतळावर नाईट लॅण्डिंग सुविधा सुरु, सिंधुदुर्गच्या पर्यटनाला चालना मिळणार : मंत्री नितेश राणे
दरम्यान, नव्याने निर्माण होणाऱ्या या जिल्ह्यात धारबांदोडा, सांगे, केपे आणि काणकोण या ४ तालुक्यांचा आणि एकूण ११५ गावांचा समावेश असणार आहे. या नव्या जिल्ह्याचे मुख्यालय केपे येथे असणार आहे. तूर्त प्रशासकीय इमारती, कार्यालये, मनुष्यबळाची व्यवस्था होईपर्यंत मडगाव येथील साल्ढाणा प्रशासकीय संकुलातील दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातूनच नव्या जिल्ह्याच्या कारभार चालणार आहे. (Pramod Sawant)
याविषयी माहिती देताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले, "देशातील आकांक्षित जिल्ह्यांना केंद्र सरकारकडून अतिरिक्त १५ कोटी रुपये मिळतात. त्यामुळे २७ टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या या नवीन जिल्ह्यात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून विशेष निधीची विनंती करता येईल." (Pramod Sawant)