मुंबई : ( Keshav Upadhye ) राजकारणात निष्ठा विकल्या जात आहेत म्हणून शिसारी येते असे राज ठाकरे म्हणतात. पण या आरशात त्यांनी आधी स्वतःला पाहायला हवे होते आणि तोच आरसा उध्दव ठाकरे यांनाही दाखवायला हवा होता. या अधःपतनाची पहिली ठिणगी कोठे पडली ते तिथेच पहायला मिळाले असते, असे प्रत्युत्तर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे बंधूंना दिले आहे.
केशव उपाध्ये म्हणाले की, "२०१९ पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात किमान काही बाकी होते. कोण कुठे उभा आहे हे स्पष्ट होते. भाजपा–शिवसेना एका बाजूला आणि काँग्रेस–राष्ट्रवादी दुसऱ्या बाजूला. मतभेद होते, तरीही, काही सीमारेषा होत्या. पण उध्दव ठाकरे यांच्या सत्तेच्या हव्यासाने त्या सीमारेषाच पुसल्या गेल्या. हिंदुत्वाशी फारकत घेत, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार खुंटीला टांगून, ज्यांच्याशी आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्याच मांडीवर बसून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, आणि इथूनच महाराष्ट्राच्या राजकारणाची घसरण सुरू झाली. हे कटू असले तरी वास्तव आहे."
हेही वाचा : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातून छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता
"जेव्हा विचारधारा सत्तेसाठी विकली जाते, तेव्हा उद्या निष्ठा विकल्या जातीलच. आज जे नगरसेवक फुटत असल्याचे तमाशे सुरू असल्याचे दुःख राज ठाकरे यांना होत आहे, त्याची बीजे २०१९ मध्येच पेरली गेली होती. आरसा कधी खोटं बोलत नाही," असेही केशव उपाध्ये म्हणाले.