आजच्या तरुण पिढीने बुद्धिबळ खेळून एकाग्रता वाढवावी: पद्मश्री अनुपमा गोखले

    22-Jan-2026
Total Views |
Padma Shri Anupama Gokhale
 
ठाणे : ( Padma Shri Anupama Gokhale ) ठाणे येथील जोशी बेडेकर स्वायत्त महाविद्यालयातील डॉ. वा.ना. बेडेकर स्मृती व्याख्यानमालेतील 49 वे पुष्प गुरुवार, दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू पद्मश्री अनुपमा गोखले यांनी क्रीडा संस्कृती या विषयावर गुंफले. यावेळी बोलताना अनुपमा गोखले यांनी लहान वयात त्यांनी सुरू केलेल्या बुद्धिबळाच्या प्रवासाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्याचबरोबर त्यांच्या या बुद्धिबळातील कारकिर्दीसाठी त्यांच्या आई-वडिलांनी, शिक्षकांनी व पुढे पती रघुनंदन गोखले यांनी देखील कसे सहकार्य केले हे थोडक्यात सांगितले. 80 व 90 च्या दशकात इतर पुरुष खेळाडूंबरोबर एकट्या महिला खेळाडू म्हणून भारतभर व जगभर बुद्धिबळाच्या स्पर्धा खेळण्यासाठी त्या जात होत्या, त्या काळातले काही विलक्षण अनुभव देखील त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
 
आज बुद्धिबळ क्षेत्रामध्ये बरीच प्रगती झाली असून तंत्रज्ञानाने बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत , जास्तीत जास्त विद्यार्थी व युवकांनी आज बुद्धिबळ खेळून आपली एकाग्रता वाढवली पाहिजे, तसेच बुद्धिबळामुळे सर्वांना एकूणच जीवनामध्ये खूप फायदा होतो असेही त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले. अनुपमा गोखले यांना वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी पद्मश्री पुरस्कार मिळाला. सर्वात लहान वयात पद्मश्री पुरस्कार मिळवणाऱ्या अनुपमा यांना पुरस्कार सोहळ्याच्या वेळी राष्ट्रपती भवनात दरबार हॉलच्या गेटवर अडवण्यात आले होते .पद्मश्री पुरस्कारासाठी फक्त अठरा वर्षावरील लोकांनाच प्रवेश आहे असे सांगून त्यांना थांबविण्यात आले.
 
हेही वाचा : महापौर पदाच्या आरक्षण सोडतीदरम्यान गदारोळ; उबाठा गटाचा सोडतीवर आक्षेप
 
मात्र राष्ट्रपती भवनातील अधिकाऱ्यांनी त्यांनाच पुरस्कार मिळाला आहे असे सांगून त्यांना आत घेतले ही मिश्किल आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ महेश पाटील यांनी यावेळी बोलताना जोशी बेडेकर महाविद्यालयातील क्रीडा संस्कृती व बुद्धिबळाच्या खेळाबद्दल आढावा घेतला. यावेळी द्रोणाचार्य पुरस्कार सन्मानित रघुनंदन गोखले हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाला प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. मानसी जंगम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ विजय बेडेकर व सदस्य डॉ. महेश बेडेकर व महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.सुचित्रा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.