बहराइचमध्ये बुलडोझर कारवाई; मेडिकल कॉलेज परिसरातील अतिक्रमित मजार उद्ध्वस्त

20 Jan 2026 16:48:38
Bulldozer Action
 
मुंबई : ( Bulldozer Action ) उत्तर प्रदेशातील बहराइच येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात बेकायदेशीररीत्या उभारलेल्या १० मजारींवर बुलडोझर फिरवण्यात आला. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. हा प्रकार महाराजा सुहेलदेव स्वायत्त राज्य वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातील मजार यांच्याशी संबंधित आहे. कथितरित्या अतिक्रमित जमिनीवर उभारलेल्या १० मजार पाडण्यात आल्या आहेत.
 
नगर दंडाधिकारी राजेश प्रसाद यांनी सांगितले की, मजार व्यवस्थापकांनी सुमारे २,००० चौरस फूट सरकारी जमिनीवर अतिक्रमण केले होते आणि वक्फ बोर्डात नोंदणीकृत असलेल्या एका मजारव्यतिरिक्त १० लहान-मोठ्या मजारांची उभारणी केली होती. तसेच अतिक्रमित परिसराभोवती चारदीवारीही बांधण्यात आली होती. या प्रकरणी देवीपाटन मंडळ आयुक्तांकडे अपील दाखल करण्यात आले होते. २०१९ मध्ये दिलेल्या निर्णयात आयुक्तांनी स्पष्ट केले होते की, वक्फ बोर्डात नोंदणीकृत एकमेव दर्गा वगळता उर्वरित सर्व मजार बेकायदेशीर आहेत आणि त्या हटविण्यात याव्यात.
 
हेही वाचा : Delhi High Court : बेकायदेशीर अतिक्रमणांबाबत दिल्ली उच्च न्यायालयाचे कडक आदेश!
 
मिळालेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर या मजारांचा परिसरात समावेश झाला, यावर महाविद्यालय प्रशासनाने आक्षेप घेतला. त्यानंतर महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी अतिक्रमण हटविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले होते. जिल्हाधिकारी अक्षय त्रिपाठी यांच्या निर्देशानुसार १० जानेवारी रोजी दर्गा व्यवस्थापनाला नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसमध्ये न्यायालयाच्या आदेशांचे पालन करून १७ जानेवारीपर्यंत बेकायदेशीर बांधकाम हटवण्याचे निर्देश देण्यात आले होते. नगर दंडाधिकारी म्हणाले, “निर्धारित मुदतीत अतिक्रमण हटवले गेले नाही, त्यामुळे प्रशासनाने सोमवारी बुलडोझरचा वापर करून १० मजार पाडल्या. त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, वक्फ बोर्डात नोंदणीकृत दर्ग्याला कोणताही हात लावण्यात आलेला नाही.
 
 
Powered By Sangraha 9.0