उद्धव ठाकरेंचे आरोप म्हणजे मतदानाला स्पीडब्रेकर; मंत्री आशिष शेलार

15 Jan 2026 15:55:12
Ashish Shelar
 
मुंबई : ( Ashish Shelar Criticises Uddhav Thackeray ) मतदान यंत्रणा आणि लोकशाहीवर विश्वास ठेवून मतदार मतदान करत असताना हा गतीरोध का? उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद आणि त्यांनी केलेले आरोप हे निवडणूक यंत्रणा, निवडणूकीत सहभागी होणारे अधिकारी आणि मतदार याला स्पीडब्रेकर आहे का? ते पत्रकार परिषद का घेतात? यावर निवडणूक आयोगाने लक्ष ठेवले पाहिजे, अशी मागणी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली.
 
मतदानानंतर बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावर उत्तर देताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "उद्धव ठाकरे वारंवार निवडणूकीच्या दिवशीच पत्रकार परिषदा घेत आहेत. त्यांच्या पत्रकार परिषदेला परवानगी होती का? यातून त्यांना त्यांचे राजकीय हेतू साध्य करायचे आहेत का? यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले विधान आचारसंहितेचा भंग आहे का? हे निवडणूक आयोगाने तपासावे."
 
हेही वाचा : CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात केवळ विकास चालणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
दोन्ही ठाकरे रडके
 
"निवडणूक यंत्रणांना तक्रार न करता ते थेट पत्रकार परिषद घेत आहेत. उद्धव ठाकरे यांनी केलेले आरोप असत्य आहेत. पहिल्यांदा ठाकरे बंधूंनी मतचोरीचा आरोप केला. पण ही चोरी नसून त्यांच्या बुद्धीतील हेराफेरी आहे. त्यांच्या राजकीय मेंदूमध्ये केमिकल लोचा झाला आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या पक्षांचे सल्लागार सडके आणि दोन्ही ठाकरे रडके, अशी स्थिती आहे. रडायचेच असेल तर लढता कशाला? मुंबईतील मतदार रडक्यांबरोबर जाणार नाहीत. ठाकरे बंधूंच्या पक्षाचा लोकशाही आणि लोकशाही यंत्रणांवर विश्वास दिसत नाही. त्यामुळे मतदार आणि लोकशाही वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करा, ही आमची मतदारांना विनंती आहे," असे ते म्हणाले.
 
हे वाचलत का? - कुठे आचारसंहिता भंग तर कुठे मारहाण , उबाठा आणि काँग्रेसचे लोकशाहीविरोधी कृत्य
 
शाई पुसणाऱ्यांवर कारवाई व्हावी
 
"ज्या व्यक्तीने शाई पुसण्याचा व्हिडीओ केला त्याला शाई पुसावीशी का वाटली? त्याचा हेतू का आहे? शाई पुसण्याआधी त्याने बोटाला तेल किंवा काही केमिकल लावले होते का? याची चौकशी झाली पाहिजे. ज्याने शाई ठेवली त्याची सुकली. ज्या व्यक्तीने शाई पुसली त्याचा हेतू गुन्हेगारीचा असून ज्याने ज्याने शाई पुसली त्याच्यावर निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला. त्यांना शाई पुसून बोगस मतदान करायचे होते. ठाकरे बंधूंच्या बोटाची शाई गेली का? याचे उत्तर द्यावे. मुंबईतील २२७ जागांपैकी किमान ५० ठिकाणी त्यांचे डिपॉजिट जाणार आहे," असेही मंत्री आशिष शेलार म्हणाले.
 
Powered By Sangraha 9.0