मुंबई : ( 10-Minute Delivery Services ) देशभरात झपाट्याने लोकप्रिय झालेल्या १० मिनिटांत डिलिव्हरी सेवांबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ब्लिंकिट, झेप्टो, स्विगी इन्स्टामार्ट यांसारख्या प्लॅटफॉर्मद्वारे दिली जाणारी ‘१० मिनिटांत डिलिव्हरी’ सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, डिलिव्हरी कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून या जलद डिलिव्हरी सेवांमुळे कामगारांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला जात होता. वेळेच्या दबावामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून, डिलिव्हरी कर्मचाऱ्यांना असुरक्षित परिस्थितीत काम करावे लागत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबर रोजी देशभरातील डिलिव्हरी कामगारांनी संप पुकारत या व्यवस्थेविरोधात तीव्र आंदोलन केले होते.
हेही वाचा : Keshav Upadhye : अग्रलेख लिहून संजय राऊत उद्धव ठाकरेंचीच अडचण का करत आहेत? केशव उपाध्ये यांचा सवाल
या आंदोलनाची गंभीर दखल घेत केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी संबंधित कंपन्यांशी चर्चा केली. त्यांच्या हस्तक्षेपानंतर Blinkit या कंपनीने आपल्या सर्व सेवांमधून १० मिनिटांत डिलिव्हरीचा पर्याय अधिकृतपणे काढून टाकला आहे. केंद्र सरकारने डिलिव्हरी कामगारांची सुरक्षितता, आरोग्य आणि कामाच्या अटी यांना प्राधान्य देत हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे डिलिव्हरी कर्मचाऱ्यांवरील वेळेचा ताण कमी होणार असून, रस्ते अपघातांचे प्रमाण घटण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, ग्राहकांना झटपट सेवा देणाऱ्या मॉडेलला यामुळे धक्का बसणार असल्याचे चित्र आहे. येत्या काळात इतर कंपन्याही या निर्णयाचे पालन करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.