मुंबई : ( Devendra Fadnavis ) "काहीही झाले तरी मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसाला मुंबई सोडून जावे लागणार नाही. त्याला मुंबईतच घर देण्याचा संकल्प आम्ही घेतला आहे. काही लोक केवळ मराठी माणसांच्या घरांबद्दल बोलत राहिले पण काम करणारी फक्त महायुतीच आहे. वेगवेगळ्या रखडलेल्या योजना आपण मार्गी लावल्या आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी एमसीए, बीकेसी येथे भाजप-शिवसेना-रिपाइं(आ) महायुतीचा वचननामा प्रकाशित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, मंत्री आशिष शेलार, मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. अमीत साटम यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "गेल्या काही वर्षात मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सुटू शकतात, असा आत्मविश्वास आम्ही मुंबईकरांमध्ये तयार केला. त्यामुळे इतर कुणीही वचननामा दिला तरी त्यांच्या आणि आमच्या ट्रॅक रेकॉर्डमध्ये अंतर असून आम्ही आमचा जाहीरनामा पूर्ण करू. तसेच पाच वर्षांनंतर जनतेच्या समोर जाताना या वचननाम्यावर आधारित कारवाईचा अहवाल लोकांसमोर मांडू."
सफाई कामगारांना मालकी हक्काचे घर
"प्रत्येक पात्र धारावीकराला कमीत कमी साडे तीनशे चौरस फुटाचे घर देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अपात्र धाराविकरांनाही न्यायालयाचा नियम न मोडता घर देणार असून धारावीमध्ये सुरु असलेल्या लघू उद्योगांना त्याच ठिकाणी उद्योग करण्याची व्यवस्था करून देणार आहोत. महापालिकेतील सफाई कामगारांना मुंबईत मालकी हक्काचे घर देणार आहे," असेही त्यांनी सांगितले.
रोहिंग्या आणि बांग्लादेशीमुक्त मुंबई करणार
"गेल्या एक वर्षात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी रोहिंगे शोधून त्यांना परत पाठवले आहे. आता आयआयटीच्या मदतीने एक एआय टूल तयार करणार असून ज्याद्वारे बांगलादेशी रोहिंग्यांना शोधणे सोपे होईल. गेल्या तीन महिन्यांपासून त्यावर प्रयोग सुरु आहेत. मुंबईतील १०० टक्के बांग्लादेशी रोहिंग्यांना शोधून त्यांना परत पाठवणार असून मुंबईला बांगलादेशी आणि रोहिंग्यांपासून मुक्त करू," अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
हेही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यावर वाद: महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा आक्षेप, नेमकं प्रकरण काय?
लाडक्या बहिणींकडून लखपती दीदींकडे
महापालिकेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच बेस्ट बस प्रवासामध्ये महिलांना ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. महिला बचत गटांसाठी ३० हजार रुपये अनुदान देण्याचे प्रस्तावित असून बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू विकण्यासाठी ई-मार्केटिंग स्थापन करणार आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी रात्रीचे गस्त पथक उभारण्यात येणार आहे.
सुसज्ज आरोग्यप्रणाली
लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णालयांमध्ये दोन हजार खाटा कमी असल्याचे कोरोनाकाळात लक्षात आले. त्यामुळे आता २ हजार नवीन खाटा तयार करण्यात येणार आहे. महपालिका रुग्णालयांचा दर्जा एम्सच्या धर्तीवर सुधारणार. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने विविध सामाजिक आणि आरोग्याचे उपक्रम राबवण्यात येणार आहे. या अनुषंगाने महापालिका रुग्णालयांशी संलग्न हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ स्थापन करण्याचा आमचा मानस आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
महापालिकेत स्वतंत्र मराठी भाषा विभाग
मराठी भाषेच्या संवर्धन आणि प्रचारासाठी महापालिकेत स्वतंत्र मराठी भाषा विभाग स्थापन करणार. महापालिकेच्या शाळा आधुनिक आणि कौशल्ययुक्त करणार. तसेच महापालिकेच्या प्रत्येक शाळेत चांगल्या पद्धतीने मराठी शिकता यावी असा आमचा प्रयत्न असेल. शिक्षणातील सर्व पद्धती वापरण्याचा प्रयत्न असेल. यासेबतच फक्त मराठी चित्रपटांकरिता खास मराठी मल्टिप्लेक्स उभारणार.
हे वाचलत का? - धारावी पुनर्विकासाला विरोध हा काँग्रेस आणि ठाकरेंच्या अंगलट येईल; मंत्री आशिष शेलारांचे सूचक विधान
खड्डेमुक्त मुंबईसाठी काँक्रीटचे रस्ते
खड्डेमुक्त मुंबईसाठी ९ मीटरपेक्षा कमी रुंदीचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे करणार. सर्व पात्र फेरीवाल्यांचे हॉकिंग झोनमध्ये पुनर्वसन करण्यात यावे आणि हॉकिंग झोन्स व्यतिरिक्त इतर सर्व क्षेत्रे नॉन-हॉकिंग झोन्स म्हणून घोषित करणार. शहरातील पार्किंगची क्षमता वाढवण्यासाठी भुयारी आणि जमिनीवरील पार्किंग निर्मिती करणार.
दिल्लीनंतर सर्वात जास्त मेट्रोचे नेटवर्क मुंबईत
दिल्लीनंतर सर्वात जास्त मेट्रोचे नेटवर्क असणारी मुंबई आहे. दिल्लीने ते २० वर्षात केले तर आपण ६ वर्षात करून दाखवले. यासोबतच मुंबईची लोकसंख्या बघता इथे ५ हजार बेस्ट बसेस आहेत. पण मुंबईकरिता १० हजार बसेसची गरज असून त्या वाढवणार आहोत. मुंबईच्या लोकल ट्रेनकरिता एमयुटीपीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून लोकलच्या डब्याची संख्या तीन ने वाढवण्यासाठी ट्रायल तयार सुरू आहे. तसेच संपूर्ण उपनगरीय रेल्वेमध्ये बंद दरवाजाचे एसी डबे तयार करणार आहोत. हे करताना सेंकड क्लासच्या तिकीटामध्ये वाढ न करता मुंबईकरांना लोकलमध्ये चांगला प्रवास देणार आहोत. २१ ठिकाणी जेट्टी तयार करून वॉटर टॅक्सी आणत आहोत. नवी मुंबई विमानतळ ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंत वॉटर टॅक्सी ने येण्याची व्यवस्था करणार आहोत. शिवडी ते वरळी पूल यावर्षीच पूर्ण करणार आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
त्यांचा टोमणेनामा, आमचा विकासनामा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
"भाजप-शिवसेना-रिपाइं (आठवले) या महायुतीचा वचननामा मुंबईकरांसाच्या दररोजच्या जीवनात बदल घडवणारा आणि त्यांना दिलासा देणारा ठरेल. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असून या मुंबईला पुढच्या पाच वर्षात जागतिक दर्जाचे शहर करण्याचे वचन देतो. मुंबईत आलेल्या मराठी माणसाचे हित आणि मराठी संस्कृती जोपासणे ही आमची जबाबदारी आहे. तसेच मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर आम्हाला पुन्हा सन्मानाने मुंबईत आणायचा आहे. येत्या पाच वर्षांत मुंबईला फिनटेक कॅपिटल करण्याची राज्य सरकारची भावना आहे. ठाकरेंच्या वचननाम्यात बाळासाहेब ठाकरेंचा साधा उल्लेखही नाही. मराठी आणि हिंदुत्वाचाही उल्लेख नाही. बाळासाहेबांच्या जनशताब्दीचा त्यांना विसर पडला आहे. त्यामुळे त्यांचा वचननामा हा टोमणेनामा आहे, तर आमचा विकासनामा आहे," अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.