मुंबई : हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर उबाठा आणि मनसेच्या वतीने शनिवार, ५ जुलै रोजी विजयी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबतच्या यूतीसंदर्भात एक मोठे विधान केले आहे. एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच असे ते म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे म्हणाले की, "बऱ्याच वर्षांनंतर राज आणि माझी भेट व्यासपीठावर झाली. आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर सर्वांचे लक्ष या भाषणाकडे आहे. पण मला असे वाटते की, आज आमच्या भाषणापेक्षा आमचे एकत्र दिसणे महत्वाचे आहे. आमच्या दोघांमधील अंतरपाट दूर केला. आता अक्षता टाकण्याची तुमच्याकडून अपेक्षा नाही. एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच."
भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही!
"भाषेचा विषय वरवरचा धरून चालणार नाही. आपण सर्वांनी या नतद्रष्टांचा अनुभव घेतला आहे. वापरायचे आणि फेकून द्यायचे. आता आम्ही दोघे मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत. डोक्यावर शिवसेनाप्रमुख नसते तर तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत होते? भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही. महाराष्ट्रात न्याय मागण्यासाठी मराठी माणूस आंदोलन करत असेल आणि त्याला तुम्ही गुंडगिरी म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत. न्याय मागणे म्हणजे गुंडगिरी नाही," असेही ते म्हणाले.