तुमची सत्ता विधानभवनात, आमची सत्ता रस्त्यावर! राज ठाकरेंचे विधान; २० वर्षांनंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर

    05-Jul-2025
Total Views |



मुंबई : तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात. आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर, असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर शनिवार, ५ जुलै रोजी ठाकरे बंधूंनी वरळीतील डोम सभागृहात विजयी मेळावा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले की, "कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा आहे. खरंतर हा प्रश्नच अनाठायी होता. कुठून हिंदीचा विषय आला ते कळले नाही. कशासाठी हिंदी? कुणासाठी हिंदी? लहान लहान मुलांवर जबरदस्ती तुम्ही करत आहात. कुणाला विचारायचे नाही, शिक्षण तज्ज्ञांना विचारायचे नाही. आमच्याकडे सत्ता आहे. आम्ही लादणार. तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात. आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर. हिंदी भाषेबद्दल मला वाईट वाटत नाही. कुठलीही भाषा श्रेष्ठ आणि उत्तमच असते. एक भाषा उभी करायला प्रचंड तपश्चर्या लागते. एक लिपी उभी करायला प्रचंड ताकद लागते. भाषा अशाच उभ्या राहत नसतात."


"या संपूर्ण हिंद प्रांतावर सव्वाशे वर्ष मराठ्यांनी राज्य केले. पण इतर प्रांतांवर आम्ही मराठी लादली का? हिंदी भाषा ही २०० वर्षांपूर्वीची भाषा आहे. महाराजांच्या काळातसुद्धा ती नव्हती. कशासाठी, कुणासाठी आणि नेमके काय करायचे आहे? मुंबई स्वतंत्र करता येते का हे त्यांनी फक्त चाचपडून पाहिले. आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाहीत. माघार घेतल्यानंतर संपूर्ण प्रकरण वेगळ्या ठिकाणी वळवले," असे ते म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे इंग्रजी माध्यमात शिकले!

"आम्ही मराठीमध्ये शिकलो. आमची मुले इंग्रजी माध्यमात शिकले. यावरून यांना मराठीचा पुळका कसा असा प्रश्न विचारला. पण बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी माध्यमात शिकले आहेत. त्या दोघांवर तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता का? दक्षिण भारतात तमिळ आणि तेलगूच्या प्रश्नावर कडवटपणे समोर येऊन उभे राहतात. त्यांना तुम्ही कुठे शिकले, तुमची मुले कुठे शिकले हे कुणीही विचारत नाही. तुमचा कडवटपणा हा शिक्षण कुठे घेतले यावर नसतो तर तो तुमच्या आतमध्ये असावा लागतो. बाळासाहेब ठाकरे इंग्रजी शाळेत शिकले पण मराठीच्या अभिमानाशी तडजोड केली नाही," असेही ते म्हणाले.