मुंबई : बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचे निरीक्षण बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळे कराडचा पाय आणखी खोलात गेल्याची चर्चा आहे.
वाल्मिक कराडने वकीलांमार्फत न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषमुक्तीचा अर्ज सादर केला होता. मात्र, यावर निर्णय देताना न्यायालयाने महत्वाचे निरीक्षण नोंदवत कराडच या घटनेचा सूत्रधार असल्याचे स्पष्ट केले आहे.
वाल्मिक कराडच गुन्हेगारी टोळीचा सूत्रधार असून त्याच्याविरोधात २० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहे. गेल्या १० वर्षांमध्ये त्याच्यावर गंभीर स्वरुपाचे किमान ७ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. खंडणी मागणे, धमक्या देणे, फोनवरून धमकावणे, महत्त्वाच्या साक्षीदारांवर दबाव आणणे आणि अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे दोन कोटींची खंडणी मागणे यासह डिजिटल एव्हिडन्स फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे कराडला दोषमुक्त करण्यात येत नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.