लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांवर कारवाई होणार? काय म्हणाल्या मंत्री आदिती तटकरे?

    30-Jul-2025
Total Views |


मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा काही पुरुषांनीही लाभ घेतल्याची माहिती पुढे आल्यानंतर आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ज्यांनी ज्यांनी शासनाची दिशाभूल करून लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतला असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, "१४ हजार पुरुषांनी लाभ घेतल्यासंबंधी सुरु असलेल्या माहितीसंदर्भात पडताळणी सुरु आहे. त्यानंतर त्यातील अपात्र महिलांची छाननी होणार आहे. प्रत्यक्षात काही महिलांची बँक खाती नसल्यामुळे त्यांच्या आधारकार्डशी पुरुषांचे खाते लिंक असेल. त्यामुळे त्यांनी ते खाते नमूद केले असावे. कदाचित त्या घरातील महिलेनेच त्या योजनेचा लाभ घेतला असावा. या सगळ्यासंदर्भात तपासणी झाल्यानंतर सगळ्या गोष्टी लक्षात येतील."


विरोधकांच्या नजरेत योजना खूपत आली

"सुरुवातीपासूनच लाडकी बहिण योजनेद्वारे लाडक्या बहिणींच्या आयुष्यात महायूतीचे सरकार आनंदाचे क्षण देऊ शकल्यामुळे ती त्यांना रूचली आहे. पण विरोधकांच्या नजरेत ही योजना खूपत आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आम्ही वेळोवेळी माहिती देत आलो आहोत. परंतू, बऱ्याचदा या योजनेसंबंधी गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. २८ जून २०२४ रोजी ही योजना घोषित झाली. १ जुलैपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यातील लाभार्थ्यांची संख्या १ कोटी ३३ लाख होती. छाननी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. वेगवेगळ्या विभागांच्या डेटाचा अक्सेस त्या विभागालाच असतो. त्यांच्याकडून तो डेटा प्राप्त होण्यासाठी काही कालावधी लागतो. जानेवारी महिन्यात कृषी विभागाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसंदर्भात आम्ही छाननी केली. आता माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेल्या २६ लाखांच्या अहवालाची छाननी आम्ही करतो आहोत. प्रत्येक विभागाकडून त्यांचा आम्ही डेटा मागवला असून तो प्राप्त झाल्यानंतर त्याची छाननी होत असते," असे त्यांनी स्पष्ट केले.

"सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल. तसेच ज्यांनी या योजनेचा चुकीचा लाभ घेतला असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची आणि त्यांच्याकडून ती रक्कम वसूल करण्याची शासनाची भूमिका आहे, हे वारंवार सांगितले आहे. लाडकी बहिण योजनेसाठी २ कोटी ६३ लाखांहून अधिक नोंदणी झाली होती. त्यापैकी २ कोटी ४७ लाख महिलांना लाभ देतो. याचा अर्थ आम्ही आधीच छाननी केली आहे," असेही त्यांनी सांगितले.

कोणत्याही विभागाचा निधी वळवला नाही

"कुठल्याही विभागाचा निधी वळवून लाडकी बहिण योजनेला दिला जात नाही. सामाजिक न्याय विभाग किंवा आदिवासी विभागाच्या नियमित निधीमध्येही अर्थसंकल्पात ३८ ते ४१ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. कुठल्याही विभागावर अन्याय होता कामा नये, याची दक्षता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेत आले आहेत," असेही मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.