मुंबई : मैदानात उतरण्याआधीच रडणे सोडा आणि हिंमत असेल तर खऱ्या मर्दांसारखे निवडणूकीच्या रिंगणात या, असे खुले आव्हान मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना दिले आहे. गुरुवार, ३ जुलै रोजी आपल्या 'एक्स' अकाउंटवर पोस्ट करत त्यांनी उबाठा गटावर निशाणा साधला.
मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "मुंबई महापालिकेची वेळेवर निवडणूक न घेता तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती केली. नवीन जनगणना झाली नसताना मुंबई महापालिकेची २२७ ची वॉर्ड रचना बदलून मनमानी करीत २३६ ची वार्ड रचना केली आणि घोळ घालून निवडणूक लांबवली. उबाठा सेनेनेच २३६ वॉर्ड रचनेचा हट्ट करून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि निवडणूक रोखून धरली."
पुन्हा निवडणूक लांबवण्याचा डाव
"आता सर्वोच्च न्यायालयाने निवडणूका घ्या, असे स्पष्ट निर्देश दिले आणि निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली. यापुर्वीच निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आणि दोन निवडणूका लढल्यानंतर आता पुन्हा चिन्ह आणि पक्षाच्या नावाबाबत न्यायालयात याचिका दाखल करुन पुन्हा निवडणूक लांबवण्याचाच डाव आखलेला दिसतोय. निवडणूकीला घाबरणारा असा हा तथाकथित मर्दांच्या पक्षांचा कारभार आहे. मुंबईकरांसाठी भाजपाच लढणारा पक्ष आहे. त्यामुळे उबाठा सेनेने हिम्मत दाखवावी आणि मैदानात उतरण्याआधीच रडणे सोडा. हिंम्मत असेल तर खऱ्या मर्दांसारखे निवडणूकीच्या रिंगणात या," असे खुले आव्हान मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.