नवी दिल्ली : देशभरात पद्धतशीरपणे धर्मांतराचे जाळे पसरले असून ते रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर असा देशव्यापी कायदा आणावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे (विहिप) केंद्रीय संयुक्त महासचिव डॉ. सुरेंद्र जैन यांनी बुधवारी केली.
छांगूर नंतर आग्र्यातील अब्दुल रहमानला अटक झाल्यानंतर धर्मांतराच्या या जाळ्याचे भक्कम पुरावे मिळाले आहेत, असे डॉ. जैन यांनी सांगितले. त्यांनी आश्चर्य व्यक्त केले की ज्या राज्यांत आधीच धर्मांतरविरोधी कायदे अस्तित्वात आहेत, तिथेसुद्धा हे जाळे बळकटपणे काम करत आहे. अटक करण्यात आलेल्या अब्दुल रहमानकडे जी तरुणी आढळली, ती हरियाणातील रोहतकची असून तिथेही कायदा असूनही प्रशासन सतर्क नाही, असे त्यांनी सांगितले.
"मिशनरी आणि मौलवी ज्या पद्धतीने धर्मांतर करत आहेत, ती संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेसाठी आव्हान आहे. आतापर्यंत १०-१२ राज्यांबद्दल माहिती मिळाली असून त्यातील ४-५ राज्यांत आधीच कायदे आहेत तरीही धर्मांतर सुरूच आहे," असे ते म्हणाले. ओडिशा, हरियाणा, उत्तराखंड, गुजरात यांसारख्या राज्यांत कायदे असूनही धर्मांतर सुरू आहे आणि ज्या राज्यांत कायदेच नाहीत, तिथे तर या मंडळींना उघडपणे वाव मिळतो, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
केंद्र सरकारने तातडीने कठोर असा देशव्यापी कायदा आणावा, अशी विहिपची मागणी आहे. "धर्मांतराचे हे कुचक्र केवळ हिंदू समाजावरच नव्हे, तर राष्ट्रीय सुरक्षेसाठीही गंभीर धोका आहे. या धर्मांतर गँग्जचे थेट संबंध पीएफआय व एसडीपीआयसारख्या दहशतवादी संघटनांशी आहेत, हे कोणालाही लपलेले नाही. त्यांना जागतिक जिहादी घटकांकडूनही निधी मिळतो. एखाद्या राज्य सरकारच्या आवाक्याबाहेरची ही गोष्ट आहे. त्यामुळे तातडीने कठोर देशव्यापी कायदा करून हे थांबवले पाहिजे," असेही डॉ. जैन यांनी स्पष्ट केले.