नवी दिल्ली : सरन्यायाधीश भुषण गवई यांनी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या नोटकांड सुनावणीतून माघार घेतली आहे.
नोटकांडप्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान ते म्हणाले, या खटल्याच्या सुनावणीत सहभागी होणे माझ्यासाठी योग्य ठरणार नाही, कारण आपण यापूर्वीही याचा भाग होतो.
न्या. वर्मा यांनी १९ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये त्यांनी इन-हाऊस कमिटीचा अहवाल आणि महाभियोगाची शिफारस रद्द करण्याची विनंती केली होती. अहवालात, घरात रोख रक्कम सापडल्याच्या प्रकरणासाठी न्यायमूर्ती वर्मा यांना जबाबदार धरण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयात न्या. वर्मा यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. त्यांनी सांगितले की यात काही घटनात्मक मुद्दे आहेत. त्यावर लवकरात लवकर खंडपीठ स्थापन करावे. यावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी नवीन खंडपीठ स्थापन केले जाईल.
त्याचवेळी संसदेत न्या. यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोगाची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. २१ जुलै रोजी १४५ खासदारांनी लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांना न्यायमूर्ती वर्मा यांना हटविण्यासाठी निवेदन सादर केले. राज्यसभेत ५० हून अधिक खासदारांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केली.