बिहारमध्ये ९४ टक्क्यांहून अधिक मतदारांची पडताळणी पूर्ण - केंद्रीय निवडणूक आयोग

    19-Jul-2025   
Total Views | 9

नवी दिल्ली : बिहारमधील मतदार यादी सघन पुनरिक्षणामध्ये (एसआयआर) ९४.६८ टक्के मतदारांची पडताळणी पूर्ण झाली आहे, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे.

आयोगाने जारी केलेल्या निवेदनानुसार, बिहारमधील एकूण ७,८९,६९,८४४ मतदारांपैकी ९०.१२ टक्के मतदारांनी आपली कागदपत्रे दिली आहेत. मात्र, ४.६७ टक्के मतदार आपल्या नोंदणीच्या पत्त्यावर सापडलेले नाहीत. याशिवाय, १.६१ टक्के मतदारांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे, ०.७५ टक्के मतदारांचे नाव अनेक ठिकाणी नोंदलेले आहे, २.३ टक्के मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले आहेत, तर ०.०१ टक्के मतदारांचा ठावठिकाणा लागलेला नाही, असेही आयोगाने स्पष्ट केले.

आगामी प्रक्रियेमध्ये १ ऑगस्ट २०२५ रोजी बिहारच्या मतदार यादीचा मसुदा जाहीर करण्यात येणार असून, नागरिक आणि राजकीय पक्षांकडून यात सुधारणा व हरकती नोंदवण्यासाठी एक महिना वेळ दिला जाईल. २४ जून २०२५ रोजीच्या आदेशानुसार, पात्र असलेला कोणताही मतदार वगळला जाणार नाही याची खात्री केली जाईल. मसुदा यादीची छापील व डिजिटल प्रती मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना मोफत दिल्या जातील आणि आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध असतील, असे निवेदनात म्हटले आहे.

तसेच, ज्या मतदारांचा मृत्यू झाला असल्याचा, कायम स्थलांतरित झाल्याचा, अनेक नोंदण्या असलेल्या किंवा निवडणूक अधिकाऱ्यांच्या अनेक भेटीनंतरही कागदपत्रे न दिलेल्या मतदारांची यादी जिल्हा स्तरावरील राजकीय पक्षांचे अध्यक्ष आणि १.५ लाख बूथ लेव्हल एजंट्स (बीएलए) यांना देण्यात आली आहे. हे सर्व बीएलए २५ जुलैपर्यंत या यादीतील नावांची तपासणी करून स्थिती स्पष्ट करतील.

प्रत्येक बीएलए दररोज ५० अर्जांची पडताळणी करून सादर करू शकतो. शेवटची सुधारित मतदार यादी ३० सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अंतिम यादीची छापील व डिजिटल प्रती पुन्हा एकदा सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना मोफत देण्यात येतील आणि ती आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध असेल, असेही आयोगाने स्पष्ट केले.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121