विधानसभेत महाविकास आघाडीचा पराभव का झाला? उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण, म्हणाले, "लोकसभेचे यश डोक्यात..."

19 Jul 2025 13:01:33


मुंबई : उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना या मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीचा पहिला भाग नुकताच प्रदर्शित झाला आहे. यावेळी संजय राऊतांनी त्यांना विधानसभा निवडणूकीतील पराभवाचे कारण काय?, असा प्रश्न विचारला असता यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, "सगळ्या गोष्टींमध्ये आपण आपले हात वर करण्यात अर्थ नाही. काही गोष्टी जबाबदारीने स्वीकारल्या पाहिजे. ईव्हीएमच्या घोटाळ्यावर खूप मोठी चर्चा सुरू आहे. तसेच मतदार याद्या, बोगस मतदार यावरही चर्चा सुरु आहे. मतदार कसे वाढले हेसुद्धा लोकांसमोर आले आहे. त्याचबरोबर काही योजना सुरू केल्या, त्याची फसगत झाली. निवडणूक जेवढी मोठी असते त्यावेळी वाद थोडे कमी असतात. मतदारसंघाच्या अनुषंगाने निवडणूक छोटी असेल म्हणजे मतदारसंघ छोटा होत जातो तसतशी स्पर्धा वाढते."

उद्धव ठाकरे असेच बोलत राहा, आपोआप...! केशव उपाध्येंची सडकून टीका

शेवटच्या क्षणापर्यंत तू तू, मै मै!

"लोकसभेच्या वेळी तीन पक्ष एकत्र आल्यानंतर थोडी खेचाखेची सुरू होते. शिवसेना आणि भाजपमध्येही ती होत होती. आम्ही महाविकास आघाडी म्हणून पहिली लोकसभा निवडणूक लढली. त्यामध्ये शिवसेनेने काहीवेळा चार-पाच वेळा जिंकलेले मतदारसंघ आपल्याला जिंकायचे आहे म्हणून सोडून दिले. पण विधानसभेला शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेची सुरु राहिली. शेवटच्या क्षणापर्यंत तू तू, मै मै झालं. त्याचा दुष्परिणाम जनतेमध्ये असा झाला की, यांच्यात आताच खेचाखेची आहे, तर नंतर काय होणार?" असे त्यांनी सांगितले.

लोकसभेचे यश सर्वांच्या डोक्यात गेले!

"लोकसभेच्या वेळी मी प्रचार सुरु केला तेव्हा माझ्याकडे उमेदवार होते, पण निशाणी नव्हती. विधानसभेत निशाणी होती, पण जागा कोणत्या आणि जागा मिळाल्या तर उमेदवारी कुणाला देणार हे निश्चित नव्हते. ही जी तू तू मै मै झाली ती स्वीकारली पाहिजे. आपल्याकडून झालेली ही सर्वात मोठी चूक होती. ही चूक परत करायची असेल तर मग एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही. यावेळी समन्वयाचा अभाव म्हणण्यापेक्षा लोकसभेचे यश सर्वांच्या डोक्यात गेले. लोकसभेत महाविकास आघाडीत नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत आपल्याला जिंकायचे आहे, हा आपलेपणा होता. विधानसभेत मला जिंकायचे आहे, असे होते. हा आपल्यातून मी पणा जेव्हा आला तेव्हा पराभव झाला," असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.




Powered By Sangraha 9.0