पंतप्रधान नरेंद्र मोदी युके आणि मालदीव दौऱ्यावर जाणार

    19-Jul-2025   
Total Views |

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी २३ जुलैपासून चार दिवसांच्या दोन देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. २३ ते २६ जुलैदरम्यान होणाऱ्या या दौऱ्यात ब्रिटनमध्ये ऐतिहासिक व्यापार करारावर स्वाक्षरी होणार असून मालदीवच्या राष्ट्रीय दिन समारंभात पंतप्रधान मोदी प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत.

दौऱ्याचा पहिला टप्पा २३ आणि २४ जुलै रोजी ब्रिटनमध्ये असेल. या भेटीत भारत आणि ब्रिटन दरम्यान मुक्त व्यापार करार (एफटीए) करण्यात येईल. या करारामुळे भारतीय निर्यातीपैकी ९९ टक्क्यावर आकारले जाणारे शुल्क कमी होणार असून, ब्रिटनमधून भारतात व्हिस्की, चारचाकी गाडी यांसारख्या उत्पादनांची निर्यात अधिक सोपी होईल. या करारासाठी गेल्या तीन वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये सतत वाटाघाटी सुरू होत्या.

हा करार केवळ व्यापार वृद्धिंगत करण्यापुरता मर्यादित नसून, दोन्ही देशांमधील सामरिक व सुरक्षा संबंधही अधिक मजबूत करण्यास मदत करणार आहे. व्यापारातील अडथळे कमी करून आर्थिक भागीदारीला व्यापक रूप देणे हे या कराराचे उद्दिष्ट आहे.

दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात २५ आणि २६ जुलै रोजी पंतप्रधान मोदी मालदीवमध्ये असतील. पंतप्रधान मोदी येथे मालदीवच्या ६०व्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होतील. अध्यक्ष मोहम्मद मुईझू यांच्या कारकिर्दीत मोदींचा हा पहिलाच मालदीव दौरा आहे.

अलीकडील काळात काही मालदीव नेत्यांनी चालवलेल्या "इंडिया आऊट" मोहिमेमुळे आणि विद्यमान सरकारच्या चीनधार्जिण्या भूमिकेमुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये ताण निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर मोदींचा दौरा संबंधांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. मालदीव दौऱ्यात पंतप्रधान मोदी ‘शेजारी प्रथम’ धोरणावर भर देऊन भारतीय महासागर क्षेत्रातील स्थैर्य व भारताच्या सामरिक हितांसाठी भागीदारीला अधिक बळकटी देण्यावर भर दिला जाईल. पंतप्रधानांचा यापूर्वीचा मालदीव दौरा जून २०१९ मध्ये झाला होता.