मुंबई : मराठी भाषेचा वाद आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
वकील घनश्याम दयालू उपाध्याय यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात ही याचिका दाखल केली आहे. राज ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते भाषेच्या माध्यमातून हिंसाचार करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच निवडणूक आयोगाला त्यांच्या पक्षाची नोंदणी रद्द करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. यासोबतच ललिता कुमारी प्रकरणाचा निर्णयाचे दिशानिर्देश संपूर्ण देशभरात लागू करण्याची मागणीसुद्धा या याचिकेत करण्यात आली आहे.
दरम्यान, राज ठाकरे हिंदी सक्तीच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. शुक्रवार, १८ जुलै २०२५ रोजी मीरा-भाईंदर येथे सभा घेत भाषा सक्तीने लादणे खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच हिंदी ही कुणाचीही मातृभाषा नाही, असेही ते म्हणाले.