छत्र निजामपूर ग्रामपंचायतीचे नाव आता रायगडवाडी! आ. गोपीचंद पडळकर यांच्या मागणीला यश

    19-Jul-2025
Total Views |


मुंबई :
रायगड किल्ला ज्या छत्र निजामपूर ग्रामपंचायतीच्या नावाने ओळखला जातो त्या ग्रामंपचायतीचे नाव रायगडवाडी असे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबतची मागणी केली होती.

शुक्रवार, १८ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नामांतराचे निर्देश दिले. या निर्णयास ग्रामपंचायत विभागाने मान्यता दिली असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेत दिली. ते म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरी डोंगरावरील असलेल्या पुरातन किल्ल्याची पुनर्बांधणी करून बळकट रायगड दुर्गाची उभारणी केली, स्वराज्याची राजधानी स्थापन केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील विविध स्वाऱ्यांचा आणि विजयाचा साक्षीदार असलेला रायगड किल्ला, तसेच या रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. याच प्रचंड दुर्गावर छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधी स्थळ आहे."


"तसेच या ठिकाणी सुप्रसिद्ध आणि शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेले श्री जगदीश्वराचे मंदिर आहे. हा ऐतिहासिक वारसा लाभलेला आणि हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला दुर्दैवाने ‘निजामपूर’ नावाच्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा पराक्रम या विचाराशी सुसंगत असे नाव ग्रामपंचायतचे असणे आवश्यक आहे. त्यानुसार निजामाच्या जुनी राजवटीचा अंत करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, या घटनेचा साक्षीदार असलेला रायगड किल्ल्याचा क्षेत्राचा ‘निजामपूर ग्रामपंचायत’ याचे नावांत पालट करून ‘रायगडवाडी ग्रामपंचायत’ असे करण्यात यावे, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राहुल कुल यांनी निवेदनाद्वारे आग्रही लेखी मागणी केलेली होती," असे त्यांनी सांगितले.

इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर!

"सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव बदलून ‘ईश्वरपूर’ करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. या मागणीनुसार, राज्य सरकारने ‘ईश्वरपूर’ हे नाव निश्चित केले आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून मान्यता मिळाल्यास इस्लामपूरचे नाव बदलून ‘ईश्वरपूर’ असे करण्यात येईल," अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.