संशोधन आणि नवोन्मेषासाठी १ लाख कोटी रुपयांच्या योजनेस मंजुरी

    01-Jul-2025   
Total Views |

नवी दिल्ली :  भारताच्या संशोधन व नवोन्मेष परिसंस्थेला बळ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रिय मंत्रीमंडळाने मंगळवारी एक लाख कोटी रुपये खर्चाच्या संशोधन, विकास व नवोन्मेष (आरडीआय) योजनेला मंजूरी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील अनुसंधान राष्ट्रीय संशोधन फाउंडेशनचे प्रशासकीय मंडळ (एएनआरएफ) आरडीआय योजनेला व्यापक धोरणात्मक दिशा देण्याचे काम करेल. एएनआरएफ चे कार्यकारी मंडळ या योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता देईल आणि दुसऱ्या स्तरावरील गुंतवणूक संस्थांची शिफारस करेल तसेच उदयोन्मुख क्षेत्रातील प्रकल्पांचा प्रकार व भवितव्य यांनाही मान्यता देईल. मंत्रीमंडळ सचिवांच्या नेतृत्वातील सचिवांच्या अधिकृत गटाकडे योजनेतील बदल, क्षेत्र व प्रकल्पाचा प्रकार यांना मान्यता देण्याची जबाबदारी असेल. याशिवाय दुसऱ्या पातळीवरील गुंतवणूक संस्था ठरविणे आणि योजनेच्या कार्यक्षमतेचा आढावा घेणे यांची जबाबदारीदेखील सचिवांच्या अधिकृत गटाची असेल. आरडीआय योजनेच्या अंमलबजावणीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग मुख्य सूत्रधार म्हणून काम करेल.

नवोन्मेषाला चालना देण्यातील आणि संशोधनाला व्यावसायिकतेत परिवर्तित करण्यातील खाजगी क्षेत्राची महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन आरडीआय योजना आखण्यात आली आहे. अत्यल्प किंवा शून्य व्याजदरावर दीर्घ काळासाठी आर्थिक सहाय्य किंवा निविदांद्वारे पुन्हा आर्थिक सहाय्य देऊन संशोधन विकास व नवोन्मेषामध्ये खाजगी क्षेत्राची गुंतवणूक वाढविणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. खाजगी क्षेत्राच्या गुंतवणुकीतील त्रुटी दूर करुन आव्हानांचा सामना करण्याच्या दृष्टीने या योजनेची आखणी करण्यात आली आहे. उदयोन्मुख आणि धोरणात्मक क्षेत्राला विकासासाठी व जोखीम पत्करण्यासाठी भांडवल पुरवून नवोन्मेषाला चालना देणे, तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देणे आणि स्पर्धात्मकता वाढविणे या गोष्टी साध्य करण्याचा योजनेचा उद्देश आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय क्रीडा धोरण (एनएसपी) २०२५ ला मंजुरी दिली. देशाच्या क्रीडा क्षेत्राचे स्वरूप बदलण्यासाठी आणि खेळांद्वारे लोकांना सक्षम करण्यासाठी हा एक ऐतिहासिक उपक्रम आहे. हे नवीन धोरण विद्यमान राष्ट्रीय क्रीडा धोरण, २००१ ची जागा घेईल आणि देशाला जागतिक क्रीडा महासत्ता आणि २०३६ च्या ऑलिंपिक खेळांसह आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्टतेसाठी एक मजबूत दावेदार म्हणून स्थापित करण्यासाठी एक दूरदर्शी आणि धोरणात्मक रोडमॅप तयार करेल.