मुंबई : दि. १ जून रोजी नागपूर येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात आता ‘आफ्रिकन सफारी’ अनुभवता येणार आहे. गोरेवाडा प्राणी संग्रहालयात आफ्रिकन सफारी विकसित करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत एफडीसीएम गोरेवाडा झू लिमिटेड आणि नॅशनल बिल्डिंग कंन्ट्रक्शन कार्पोरेशन (एनबीसीसी -India) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
विधानभवनातील समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात एनबीसीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक के.पी.एम. स्वामी, कार्यकारी संचालक प्रविण डोईफोडे आणि महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नरेश झुरमुरे, एफडीसीएम गोरेवाडा झू लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखरन बाला यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या. यावेळी वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे आदी यावेळी उपस्थित होते.
गोरेवाडा प्राणी संग्रहालयात आफ्रिकन सफारी सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी निर्देश दिले होते. त्या नुसार आफ्रिकान सफारी आणि प्रवेशद्वारावर प्लाझा विकसित करण्यात येणार आहे.
या प्रकल्पाअंतर्गत गोरेवाडा प्राणी संग्रहालयातील सुमारे 63 हेक्टर जागेवर आफ्रिकन सफारी विकसित करण्यात येणार असून, सुमारे 22 आफ्रिकन प्रजातींचा समावेश या भागात असणार आहे. तसेच प्रवेशद्वाराचेही काम करण्यात येणार आहे. सुमारे 285 कोटींचा हा प्रकल्प असून ही कामे १८ महिन्यांत हे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही आफ्रिकन सफारी पूर्णत्वास गेल्यानंतर नागपूर हे प्राणीसंग्रहालय पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाणार असून, पर्यावरण जागरूकता व जैवविविधतेचे संवर्धन यास चालना मिळणार आहे.
प्रकल्पाची पार्श्वभूमी:
• प्राणीसंग्रहालयातील इंडियन सफारीचे काम आधीच पूर्ण झाले असून, २६ जानेवारी २०२१ रोजी त्याचे लोकार्पण करण्यात आले होते.
• आता दुसऱ्या टप्प्यात आफ्रिकन सफारी तयार होणार आहे.
• एनबीसीसी या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेमार्फत हे बांधकाम करण्यात येणार आहे.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....