दिल्लीत पाडणार कृत्रिम पाऊस? कसा पाडला जातो? प्रक्रिया काय? - A to Z माहिती

    01-Jul-2025   
Total Views |

नवी दिल्ली : (Delhi) दिल्लीमध्ये हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ४ ते ११ जुलै दरम्यान, पहिल्यांदाच क्लाउड सीडिंग (Cloud Seeding) द्वारे कृत्रिम पावसाची चाचणी करण्यात येणार आहे. आयआयटी कानपूरच्या तांत्रिक साहाय्याने हा प्रयोग करण्याची दिल्ली सरकारची योजना आहे. दिल्लीतील प्रदूषण पातळी वाढल्यामुळे, सरकारने हा निर्णय घेतला आहे.

क्लाउड सीडिंग ऑपरेशनसाठीचा उड्डाण आराखडा आयआयटी कानपूरने तांत्रिक समन्वयासाठी पुणे येथील भारतीय हवामान विभागा (आयएमडी) कडे सादर केला आहे आणि तो ४ ते ११ जुलै दरम्यान अंमलात आणला जाणार आहे. प्रस्तावित तारखांमध्ये प्रतिकूल हवामानाच्या बाबत पर्यायी वेळेची मागणी करणारा प्रस्ताव नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) कडे पाठवण्यात आला आहे. डीजीसीएकडून परवानगी घेतल्यानंतर हवामान परिस्थितीची अनुकूलता तपासून कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग केला जाणार आहे.

हे वाचलंत का? - विद्यार्थिनीवरील अत्याचार पूर्वनियोजित, कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणी एसआयटीचा खुलासा!


माध्यमांमधील वृत्तानुसार, या योजनेवर सुमारे ३.२१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. प्रत्येक चाचणी ९० मिनिटांची असणार आहे. यादरम्यान विमानातून सिल्व्हर आयोडाइडचे नॅनो कण आणि आयोडीनयुक्त मीठ आणि रॉक सॉल्ट यांचे मिश्रण फवारले जाणार आहे.कृत्रिम पावसाच्या चाचणीमध्ये, वायव्य आणि दिल्लीच्या बाहेरील भागात कमी सुरक्षित हवाई क्षेत्रात ५ विमानांद्वारे कृत्रिम पाऊस पाडता येईल. सुमारे ९० मिनिटे चालणारे प्रत्येक उड्डाण सुमारे १०० चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापेल.

‘क्लाऊड सीडिंग’ तंत्रज्ञान म्हणजे काय?

कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी 'क्लाउड सीडिंग' नावाचे तंत्रज्ञान वापरले जाते. यात ढगांमध्ये विशिष्ट रसायने मिसळून पाऊस पाडला जातो, ज्यामुळे हवेतील धूळ आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होते. सोप्या शब्दात सांगायचे तर ढगांमध्ये पावसाचे बीज पेरण्याच्या प्रक्रियेला ‘क्लाऊड सीडिंग’ म्हणतात. यामध्ये, सिल्व्हर आयोडाइड, पोटॅशियम क्लोराईड आणि सोडियम क्लोराईड यांसारखे रासायनिक पदार्थ विमानांच्या मदतीने ढगांमध्ये फवारले जातात. फवारलेले हे पदार्थ ढगांमध्ये पसरतात आणि ढगांतील पाण्याचे थेंब गोठवतात. ढगातील बाष्प शोषून थेंबाचा आकार वाढून ढगांतून पाऊस पडायला सुरुवात होते. अशाप्रकारे अशाप्रकारे कृत्रिम पाऊस पाडता येतो.
 
अन्य कोणत्या देशांमध्ये हा प्रयोग केला जातो?

हे तंत्रज्ञान अनेक देशांमध्ये वापरले जाते, ज्यात अमेरिका, चीन, रशिया आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांचा समावेश आहे. इस्रायलमध्ये नियमितपणे कृत्रिम पाऊस पाडला जातो कारण तिथे नैसर्गिकरित्या खूपच कमी पाऊस पडतो. संयुक्त अरब अमिरातीतर्फे देखील संशोधन आणि संचालन कार्यक्रमांमध्ये कृत्रिम पाऊस पाडला जातो. चीनने २००८ मध्ये बीजिंग ऑलिम्पिकदरम्यान विमान आणि जमिनीवरील बंदुकांच्या मदतीने ‘क्लाऊड सीडिंग’ केले होते. त्यानंतर त्यांना प्रदूषण नियंत्रणात खूप मदत झाल्याची माहिती आहे.

भारतात पहिल्यांदा कधी वापरलं गेलं?

भारताने १९८४ मध्ये पहिल्यांदा याचा वापर करण्यात आला होता. तेव्हा तामिळनाडूत भीषण दुष्काळ पडला होता. त्यानंतर तामिळनाडू सरकारने १९८४-८७, १९९३-९४ दरम्यान क्लाऊड सीडिंग तंत्रज्ञानाची मदत घेतली होती. २००३ आणि २००४ मध्ये कर्नाटक सरकारने क्लाऊड सीडिंगचाही प्रयोग केला. त्याच वर्षी महाराष्ट्र सरकारने हा प्रयत्न केला होता.

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\