डिजिटल इंडियाची १० वर्षे म्हणजे सशक्त युगाची सुरुवात – पंतप्रधान नरेंद्र मोदी

    01-Jul-2025   
Total Views |

नवी दिल्ली : 'डिजिटल इंडिया'ची १० वर्षे पूर्ण होत असताना, पुढचे दशक आणखी परिवर्तनकारी असेल. देश आता 'डिजिटल प्रशासन' कडून 'जागतिक डिजिटल नेतृत्वा' कडे वाटचाल करत असून भारत 'इंडिया-फर्स्ट' वरून 'इंडिया-फॉर-द-वर्ल्ड' कडे वाटचाल करणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले आहे.

डिजिटल इंडिया मिशनला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत लिंक्डइन हँडलवर 'अ डिकेड ऑफ डिजिटल इंडिया' या शीर्षकाचा ब्लॉग शेअर करून हे साजरे केले. त्यांनी डिजिटल इंडियाच्या दहा वर्षांच्या प्रवासाचे वर्णन केले आहे. पंतप्रधानांनी २०१४ मध्ये मर्यादित इंटरनेट अॅक्सेस आणि डिजिटल सेवांपासून २०२४ मध्ये भारत डिजिटल तंत्रज्ञानात जागतिक नेता कसा बनला हे स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, पूर्वी भारतीय लोक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करू शकतात की नाही याबद्दल लोकांना शंका होती. परंतु सरकारने लोकांवर विश्वास ठेवला आणि श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला. आज, डिजिटल साधने १४० कोटी भारतीयांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनली आहेत. शिक्षण आणि व्यवसायापासून ते सरकारी सेवांपर्यंत सर्व गोष्टींमध्ये त्यांची उपलब्धता आहे. ते म्हणाले की २०१४ मध्ये भारतात सुमारे २५ कोटी इंटरनेट कनेक्शन होते. आता ही संख्या ९७ कोटींहून अधिक झाली आहे. गलवान आणि सियाचीन सारख्या दुर्गम भागातही हाय-स्पीड इंटरनेट पोहोचले आहे. देशातील ५जी रोलआउट जगातील सर्वात वेगवान आहे. यामध्ये, फक्त दोन वर्षांत सुमारे ५ लाख बेस स्टेशन स्थापित करण्यात आले आहेत, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींनी युपीआयसारख्या प्लॅटफॉर्मवर विशेष भर दिला. ते म्हणाले, युपीआय आता दरवर्षी १०० अब्जाहून अधिक व्यवहार हाताळते. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे ४४ लाख कोटी रुपये थेट लोकांना पाठवण्यात आले आहेत. यामुळे मध्यस्थांना दूर करून सुमारे ३.५ लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. परिणामी सरकारकडून दिले जाणारे अनुदान किंवा इतर फायदे इतर कोणत्याही माध्यमाऐवजी थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होतात, असेही त्यांनी नमूद केले.