मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Asha Bhosale letter to Mohanji Bhagwat) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीयचा समारोप गुरुवार, दि. ५ जून रोजी स्मृती मंदिर, रेशीमबाग, नागपूर येथे संपन्न झाला. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आपल्या विचारपाथेयातून उपस्थितांना संबोधित केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री अरविंद नेताम उपस्थित होते. समारोपाला ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. प्रकृती ठीक नसल्याने त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाहीत. मात्र त्यांनी सरसंघचालकांना एक पत्र लिहिले आहे.
हे वाचलंत का? : जोवर द्विराष्ट्रवादाचे भूत अस्तित्वात आहे, तोवर दहशतवादाचा धोका कायम राहील! : सरसंघचालक
पत्रात त्यांनी म्हटले की, "कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीयच्या समारोप समारंभासाठी आपण दिलेल्या आमंत्रणाबद्दल मी अत्यंत आभारी आहे. आपण माझ्या घरी आलात आणि मला वैयक्तिकरित्या आणि नंतर औपचारिकरित्या आमंत्रित केले, त्याबद्दल मी आभारी आहे. संघाच्या मुख्यालयाला भेट देण्याची आणि राष्ट्रसेवेसाठी स्वतःला समर्पित करण्यासाठी प्रशिक्षण घेणाऱ्या कार्यकर्त्यांना भेटण्याची माझी तीव्र इच्छा होती. परंतु दुर्दैवाने, अमेरिकेहून परतल्यानंतर, प्रकृती अस्वास्थ्यामुळे, हे शक्य झाले नाही. डॉक्टरांनी मला पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. म्हणून, सर्व तयारी करूनही, मला जड अंतःकरणाने हा दौरा रद्द करावा लागत आहे."
पुढे त्यांनी म्हटले की, "संघाच्या कार्याबद्दल मी आधीच माझ्या शुभेच्छा आणि भावना व्यक्त केल्या आहेत. संघाचे स्वयंसेवक आणि त्यांचे कार्य हे आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक मोठी आशा आणि आधार आहे. मी संघाच्या कार्यासाठी मनापासून शुभेच्छा देते आणि शक्य तितके सहकार्य करण्याचे आश्वासन देखील देते. मी लवकर बरी होऊन तुम्हाला वैयक्तिकरित्या भेटू शकेन अशी माझी मनापासून इच्छा आहे. मला आशा आहे की हे लवकरच शक्य होईल." तत्पश्चात आशाताई भोसले यांच्या पत्राला उत्तर देत सरसंघचालकांनी त्यांना बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि लवकरच त्यांना भेटण्याचे आश्वासनही दिले.