कोलकाता : कोलकाता येथील साउथ कोलकाता लॉ कॉलेजमध्ये २५ जून रोजी विद्यार्थिनीवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेचा सखोल तपास करण्यात येत आहे. पीडित विद्यार्थिनी पहिल्या वर्षात शिकत असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी कॉलेजच्या बाहेरील गेटपासून ते गार्ड रुमपर्यंतच्या सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले. या फुटेजमध्ये दोन आरोपींनी पीडित मुलीला जबरदस्तीने गेटजवळून गार्ड रूमकडे नेताना स्पष्ट दिसून येत आहे. तसेच तिला बाहेर येण्यापासूनही थांबवण्यात आले. हे सीसीटीव्ही फुटेज पीडितेच्या तक्रारीशी पूर्णपणे जुळत असल्याचे पोलिसांनी सांगितले .
या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये प्रमुख आरोपी तसेच माजी विद्यार्थी मनोजीत मिश्रा, प्रमित मुखर्जी आणि जैद अहमद हे दोन विद्यार्थी आणि कॉलेजचा सुरक्षा रक्षक पिनाकी बनर्जी यांचा समावेश आहे.
विशेष तपास यंत्रणेत भर
या प्रकरणात सुरुवातील पाच सदस्यांची विशेष तपास यंत्रणा होती. त्यात आता चार सदस्यांची भर घातली गेली. त्यामुळे आता या तपास यंत्रणेत ९ जणांचा समावेश आहे. यामध्ये महिला पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यांनी कॉलेज प्रशासनाकडून अधिक माहिती घेत आरोपींच्या घरी जाऊनही तपास केला.