नवी दिल्ली : भारत – अमेरिका व्यापार करारावर ८ जुलैपर्यंत शिक्कामोर्तब होऊ शकते. मुख्य वाटाघाटीकार आणि वाणिज्य विभागातील विशेष सचिव राजेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील एक भारतीय पथक चर्चेला अंतिम स्वरूप देण्यासाठी वॉशिंग्टनमध्ये आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी अलीकडेच सांगितले की, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराची परिस्थिती ८ जुलैपर्यंत पूर्णपणे स्पष्ट होईल. ट्रम्प यांच्या मते, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराच्या मार्गात येणारे सर्व अडथळे लवकरच दूर केले जाऊ शकतात. या करारात आयटी, उत्पादन आणि सेवा तसेच ऑटोमोबाईल क्षेत्राचा समावेश असू शकतो.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीदेखील व्यापार करारावर शिक्कामोर्तब करण्यासंबंधीचे संकेत दिले आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, भारत सध्या ज्या टप्प्यावर आहे ते पाहता मजबूत अर्थव्यवस्थांसोबत आपण जितक्या लवकर असे करार करू, तेवढे दोन्ही अर्थव्यवस्थांसाठी चांगले आहे. भारताला अमेरिकेसोबत एक चांगला करार करायचा असेल, परंतु यासाठी काही अटीही असतील; असेही अर्थमंत्र्यांनी नमूद केले आहे.